UPSC Exam : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षेमध्ये मराठी भाषिकांचा टक्का वाढविण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव समिती काही महत्वाकांक्षी उपाय सुचविण्याच्या विचारात आहे. महाराष्ट्रातील मुले उत्तम इंग्रजी लिहितात, वाचतात. त्यांना चांगले गुणही मिळतात. पण बोलायला अडचण येते, असे निरीक्षण नोंदवून जाधव समिती इंग्रजी भाषेची अडचण दूर करण्यासाठी काम करत आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र ठरविण्यासाठी अर्थतज्ज्ञ आणि भाषा तज्ञ्ज डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीचा महत्वाकांक्षी अहवाल अंतिम टप्प्यात आला असून लवकरच शिफारशींसह राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. डॉ. जाधव यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना याबद्दल माहिती दिली.
यावेळी डॉ. जाधव म्हणाले. राज्यातील मुलांना उत्तम इंग्रजी लिहिता, वाचता येते. त्यांना चांगले गुणही मिळतात. पण बोलायला अडचण येते. इंग्रजी भाषेच्या अडथळ्यामुळे ते स्पर्धेत मागे पडतात. त्यामुळे UPSC मध्ये महाराष्ट्राचा टक्का कमी दिसतो. यावर उपाय म्हणून इयत्ता नववीनंतर इंग्रजी भाषेसाठी शाळेत स्वतंत्र तासिका असावी का? त्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा का? यावर समिती विचार करत आहे.
हिंदी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश कधीपासून करावा याबाबत डॉ. जाधव यांनी सोलापुरकरांची मते जाणून घेतली. आता मुंबई येथील अंतिम बैठकीत विचारविनिमय होऊन तज्ञांच्या मार्गदर्शनातून एक चांगला अहवाल सरकारकडे सादर केला जाईल. परंतु भविष्यात जे धोरण सरकार ठरवेल, त्याबाबत आधी समाजात जाऊन लोकांची मते घेतली जातील. नंतरच अंमलबजावणीसाठी हा प्रायोगिक प्रकल्प त्रिभाषा समिती ठरवू शकते, असेही मत डॉ. जाधव यांनी व्यक्त केले.
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे समितीच्या दौऱ्यात बदल झाला. पण समिती अंतिम आणि सर्वसमावेशक अहवाल 5 जानेवारीला राज्य सरकारला सादर करणार आहे. आपली निरीक्षणे आणि शिफारसी सरकारने स्वीकारल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याबद्दलचे धोरण निश्चित केले जाईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
तसेच हा केवळ चर्चा-विनिमयाचा अहवाल नसून, त्याची अंमलबजावणी आणि पाठपुरावा करून प्रायोगिक स्तरावर त्रिभाषा समितीचे धोरण यशस्वी करण्याचा मानस आहे. या शिफारसींमुळे ग्रामीण आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चा मार्ग सुकर होणार असून, येत्या काळात प्रशासकीय सेवेत मराठी तरुणांची संख्या लक्षणीय वाढेल, अशी अपेक्षा आहे, असेही जाधव म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.