Narhari Zirwal
Narhari Zirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

दिंडोरीतील १२१ किलोमीटरचे रस्ते होणार जिल्हा मार्ग!

Sampat Devgire

वणी : दिंडोरी (Dindori) तालुक्यात रस्त्यांचे मोठे जाळे असून, मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. मात्र अनेक प्रमुख रस्तेही (Roads) ग्रामीण मार्ग असल्याने त्यांना कमी निधीची तरतूद असल्याने रस्ते लवकर खराब होत होते. त्यामुळे ज्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ आहे, त्या सर्व रस्त्यांना दर्जा उन्नतीसाठी आमदार नरहरी झिरवाळ (Narahari Zirwal) यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तालुक्यातील १२१ किलोमीटरचे रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग होणार असून, सदर रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण होणार आहे. (Dnndori constituation`s roads need to be good maintenance)

दिंडोरी तालुक्यात प्रत्येक गावात रस्त्यांचे जाळे आहे. मात्र त्यातील बहुतांश रस्ते ग्रामीण मार्ग आहेत. तालुक्यात हरितक्रांती व औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होत असल्याने गावोगावी वाहनांची संख्या मोठी असून, शेतमाल व इतर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात सर्वच प्रमुख मार्गांवर होत आहे. सदर रस्ते ग्रामीण मार्ग असल्याने तेथील कामांना खूपच कमी निधी मिळत असल्याने रस्ता जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे आमदार नरहरी झिरवाळ, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलवत त्यांना सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करून रस्त्यांचे रुंदीकरण मजबुतीकरण होण्याच्या दृष्टीने अहवाल बनविण्यास सांगितले होते.

अधिकाऱ्यांनी सर्व रस्त्यांचे दर्जा उन्नती प्रस्ताव शासनास पाठवले होते. त्यानुसार भनवड-लखमापूर-कादवा-खेडगाव-शिंदवड- वडनेर हा रस्ता राज्यमार्ग झाला आहे. कोचरगाव-उमराळे-दिंडोरी-पालखेड-लोखंडेवाडी- जोपूळ-पिंपळगाव रस्ता राज्यमार्ग होणार आहे . ननाशी- वलखेड रस्ताही राज्य मार्ग प्रस्तावित आहे. नाशिक-दिंडोरी-वणी-कळवण रस्ता राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शासनाने २८ जूनला ग्रामीण इतर जिल्हा मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा उन्नती दिली आहे. ग्रामीण मार्गांना खूप कमी निधी मिळत होता, तर सदर मार्ग आता जिल्हा मार्ग झाल्याने मोठ्या प्रमाणात निधी मिळणार असल्याने रस्त्यांचे कामे मजबूत होणार आहे.

दिंडोरी तालुक्यात अनेक रस्ते ग्रामीण मार्ग असल्याने त्यास निधी तरतूद कमी आहे. त्यामुळे सर्व रस्त्यांचे फेरसर्वेक्षण करत त्यांची दर्जा उन्नती करण्यात आली असून, त्यामुळे आता या रस्त्यांचे नूतनीकरण करता येणार आहे. बहुतांश रस्त्यांची कामे मंजूर आहेत. मात्र ती कामे पावसाळ्यानंतर सुरू होतील. रस्ता, वीज व पाणीप्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहे.

नरहरी झिरवाळ, माजी उपाध्यक्ष, विधानसभा

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT