Army Training file photo Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Employment; `अग्निवीर` योजनेत ४० टक्के उच्चशिक्षित युवक

अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला नाशिकच्या तोफखाना केंद्रात प्रशिक्षण सुरु

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) हिंसक आंदोलनाने देशभर चर्चेत आलेल्या अग्निवीर (Agneevir) भरती योजनेचा विरोध चव्हाट्यावर आला खरा, पण त्याच अग्निवीर योजनेत हजारो तरुण उत्स्फूर्त सहभागी होत असल्याचे दुसरे चित्र आहे. येथील तोफखाना प्रशिक्षण केंद्रात चार हजार युवकांचे प्रशिक्षण सुरु झाले असून रोजगाराची समस्या तीव्र असल्याने यातील 40 टक्के युवक उच्चशिक्षित आहेत. (Highly qualified youth select a `Agneevir` Option of Army)

नाशिक रोड तोफखान्यात आतापर्यंत चार हजारांहून अधिक अग्निवीरांची भरती होऊन त्यांच्या प्रशिक्षणाला सुरवात झाली आहे. महाराष्ट्रातील या एकमेव प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी आलेल्या अग्निवीरांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक उच्चशिक्षित युवक आहेत हे विशेष!

अग्निवीर उपक्रमाला प्रखर विरोधासाठी हिंसक आंदोलनाचा धुरळा शांत झाला असताना, लष्कराकडून राज्यात नाशिक रोड तोफखान्यात पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. द्रोणाचार्य सभागृहापासून काही अंतरावर पूर्वी उपाहारगृह असलेल्या ठिकाणी अग्निवीरांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू झाला आहे. तेथे नोंदणी, कागदपत्रांच्या तपासणी, बायोमेट्रीक औपचारिकेनंतर त्यांना १५ मिनिटांची चित्रफीत दाखविली जाते. त्यानंतर त्यांना त्यांच्या रेजिमेंटचे गणवेशासह इतर साहित्याचे किट दिले जाते. कर्नल निखिल. पी यांच्या देखरेखीखाली हा कक्ष कार्यरत आहे. त्यात, अग्निवीरांना भारतीय लष्कराचा तोफखान्याचा इतिहास समजून सांगितला जातो.

नाशिक रोडला चार हजारांहून अधिक अग्निवीर आतापर्यंत प्रशिक्षणासाठी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यात, ४० टक्क्यांहून अधिक पदवीधर आणि उच्चशिक्षित असल्याचे सांगण्यात आले. १७ ते २१ वयोगटातील युवकांसाठी असलेल्या या संधीत पहिल्या प्रयत्नात भारतीय लष्कराला उच्चशिक्षित युवक असल्याने पूर्वीपेक्षा अधिक शिक्षित अग्निवीर मिळणार आहे.

२१ आठवड्यांचे प्रशिक्षण

नव्याने भरती होणाऱ्या अग्निवीरांना २१ आठवड्यांत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात पहिले दहा आठवडे सामान्य (बेसिक) आणि पुढील आठवडे ॲडव्हान्स प्रशिक्षणाची सोय आहे. पारंपरिक प्रशिक्षणात कपात न करता प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून सध्याचा प्रचलित अभ्यासक्रम पूर्ण केला जाणार आहे. त्यामुळे सैनिकाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही. तोफखान्यात अद्ययावत पध्दतीच्या प्रशिक्षणाची सोय आहे. विशेषतः तोफगोळे डागतांना ते अचूक ठिकाणी पडले का, यावर देखरेख ठेवण्यासाठी एक फळी असते. तोफखान्याच्या पुढच्या भागात आघाडीवर कार्यरत या फळीला संगणकीय सिम्युलेशन पद्धतीने भूमिगत सुरुंग आणि इतर अडथळ्यासह चढाईची दिशा योग्य मारा त्याची दिशा याचे प्रशिक्षण दिले जाईल.

साधारण त्यात ४ ट्रेड आहेत. टेक्निकल अलिस्टेट, ऑपरेटर, चालक आणि गनर या प्रकारात कौशल्यानुरुप त्यांची रेजिमेंट ठरेल. सामुहीक ऑनलाइन परिक्षा होते. त्यातील गुण रेजिमेंट निवडीसाठी महत्त्वाची असेल. १० आठवड्यांत ८ किमी धावणे, पहिली थेट फायरिंग, संचलन, झिरोईंग, एमआर फायरिंग, ८ किमीपर्यंत शस्त्रसाहित्य घेउन धावण्याचे व फायरिंगचे प्रशिक्षण यांसह विविध दहा प्रकारच्या फायरिंग असे स्वरूप असेल. तर २१ आठवड्यांच्या प्रशिक्षणात तांत्रिक अद्यावतता, २४ किमीपर्यत धावणे, संचालन, तोफांचे फायरिंग यासह यासह ३० हून अधिक प्रकारचे कौशल्य शिकविली जाणार आहेत.

धुके घाट अन् जंगल

वाहनचालक घडविण्यासाठी भारत-स्वीडन संयुक्त निर्मित प्रशिक्षण सिम्युलेशन वाहन आहे. सुमारे दीड कोटीच्या या सिम्युलेशन यंत्रात वाहनाच्या केबिन बाहेरील स्क्रिनमुळे एकावेळी दाट धुके, गर्द वनराई आणि जंगलासह बर्फाळ डोंगरावर वाहन चालविण्याची अनुभव देणारे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते. चारही बाजूने बंदीस्त स्वरुपातील या केबिनमध्ये बसल्यानंतर खड्यासह डोंगराळ आणि जंगलातून वाहन चालवीत असल्याचा अनुभव देत, उत्कृष्ट चालक घडविण्यासोबत अग्निविरांना प्रादेशिक परिवहन केंद्राकडून जागेवर परवाना देण्याची सोय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT