Aamshya Padvi : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण दिवसेंदिवस अधिकच तापताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना दरम्यान त्यांच्या मागण्या मान्य करताना सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला व हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. आता हैदराबाद गॅझेटच्या आधारे आम्हालाही अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे. त्यावर शिवसेनेचे (शिंदे गट) नंदूरबारचे आदिवासी आमदार आमश्या पाडवी यांनी संताप व्यक्त केला असून थेट सरकारला इशारा दिला आहे.
आदिवासींमध्ये बंजारा, धनगर समाजाला घुसू देणार नाही असं आमश्या पाडवींनी ठणकावून सांगितलं आहे. जर सरकारने बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासीचे आरक्षण दिले तर मी सरकारमधून बाहेर पडेल असा इशारा त्यांनी दिला. आमश्या पाडवी यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणखी वातावरण तापण्याची शक्यता असून यामुळे सरकारसह खुद्द एकनाथ शिंदे यांचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढला. हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याच आधारे आता बंजारा समाजाकडून अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी होत आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाचीही अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी आहे.
परंतु बंजारा समाजाच्या या मागणीला आमदार आमश्या पाडवी यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. हैदराबाद गॅझेट लागू झाले याचा अर्थ कुणीही आदिवासी प्रवर्गात येईल असे होणार नाही. आदिवासी बनण्यासाठी आदिवासींच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. बंजारा समाजाने कितीही आंदोलने केली तरी आम्ही त्यांना आदिवासींमध्ये येऊ देणार नाही. धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासींमध्ये घुसू देणार नाही असं आमश्या पाडवी म्हणाले.
मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याविषयावर मराठा समाजाने बघावं. आम्ही आमची लढाई लढणार आहोत. मी जोपर्यंत आमदार आहे, तोपर्यंत तरी कुणालाही आदिवासींमध्ये घुसू देणार नाही असा थेट इशारा आमश्या पाडवी यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.