Kalamkar Vs Jagtap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kalamkar Vs Jagtap : ''...तर मग कोट्यवधी रुपये मुरले कुठे?'' अभिषेक कळमकरांचा आमदार जगतापांना सवाल!

Ahmednagar road problem : ''पण त्याआधी खड्डयांचे शहर ही ओळख संपुष्टात आली पाहिजे.'' असंही कळमकर म्हणाले आहेत.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : नगर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहरजिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी थेट राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. नगर शहर व रस्त्यांवरील खड्डे यांचे अतूट नाते मागील नऊ दहा वर्षांत तयार झाले आहे, असं ते म्हणाले.

याचबरोबर ''नगर शहराचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे लोकप्रतिनिधी रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी खेचून आणल्याचा दावा करतात. जर दावा तो खरा असेल तर मग एवढे कोट्यवधी रुपये मुरले कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण शहरात एकही रस्ता वाहतूक योग्य राहिलेला नसून शहराचा मध्यवर्ती भाग, बाजारपेठ, उपनगरांतील रस्त्यांवरील खड्डयांचे साम्राज्य कायम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच लोकप्रतिनिधींनी नुकतीच मनपा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरात कचरा व्यवस्थापनाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना खड्डे व त्यामुळे सामान्य नगरकरांना दररोज सहन करावा लागत असलेला त्रास दिसला नाही का?, तसेच खड्डेमय रस्त्यांचे ग्रहण कधी सुटणार, असा सवालही अभिषेक कळमकर यांनी उपस्थित केला आहे.

अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे की, ''नगर शहरातील खड्डयांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. खड्डेमय रस्त्यावरुन वाहन चालवताना नागरिक त्रासले आहेत. अनेकांना मणक्यांचे, सांध्याचे विकार जडून त्यांना दवाखान्यावर हजारो रुपये खर्च करावे लागत आहे. शाळकरी मुलांनाही याच खड्डेमय रस्त्यांवरुन सायकल चालवत वाट काढावी लागते. मॉडेल रस्ते म्हणून गवगवा झालेल्या तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग रस्त्याची तर सहा महिन्यातच दुरावस्था झाली आहे. पाईपलाईन रोड, गुलमोहोर रोड, मिस्किनमळा रस्ते वर्ष पूर्ण होण्याच्या आत उखडले गेले आहेत.''

शहराच्या मध्यवर्ती भागातही बाजारपेठेत रस्त्यांची दुरवस्था आहे. कुठे काम सुरु असेल तर ते सहा महिने, वर्षभर रेंगाळलेले असते. त्याचा अधिकचा त्रास नगरकरांना सहन करावा लागतो. अशावेळी कुठे गेले तुमचे विकासपर्व असे सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

महानगरपालिका प्रशासनावर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची(संग्राम जगताप) जरब असायला हवी. आयुक्तांवरही त्यांचा विकासाच्या दर्जाच्या कामांसाठी दबाव व धाक असायला हवा. अशावेळी आयुक्तांमार्फत त्यांनी रस्त्यांच्या दर्जाबाबत लक्ष दिले पाहिजे. मनपाने रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांकडून गुणवत्ता राखली जाईल याची काळजी घेतलीच पाहिजे. मात्र दुर्देवाने प्रशासन आपल्या कर्तव्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे.

तर नगरची जनता तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल -

राज्यात तुम्ही सत्तापक्षात आहात. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी तुमचे अतिशय निकटचे संबंध आहेत. या माध्यमातून तुम्ही दोन चार कोटी रुपये शहरातील फक्त खड्डे बुजविण्यासाठी आणले, तरी शहर खऱ्या अर्थाने खड्डेमुक्त होऊ शकते. हे न करता नगरसेवकांनी हाताळायचे प्रभाग स्वच्छतेचे विषय हाताळण्यात तुमचा वेळ खर्च होत आहे.

नगरची नवी ओळख निर्माण होत असल्याचे नेहमीच सांगितले जाते. पण त्याआधी खड्डयांचे शहर ही ओळख संपुष्टात आली पाहिजे. त्यासाठी इच्छाशक्ती दाखवली तर नगरची जनता तुम्हाला खरोखरच मनापासून धन्यवाद देईल, असेही कळमकर यांनी म्हटले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT