Malegaon News : मालेगाव मध्य हा मुस्लिम समाज बहुल मतदार संघ आहे. येथे सध्या 'MIM' पक्षाचे मौलाना मुफ्ती आमदार आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. मालेगाव मध्य हा काँग्रेससाठी अतिशय सोपा मतदारसंघ मानला जातो.
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हा मतदारसंघ 'MIM'कडून हिसकावून घेण्यासाठी जोरदार फील्डिंग लावली होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसचे हे मनसुबे उधळले जाण्याची चिन्हे आहेत.
मालेगाव शहरात शनिवारी समाजवादी पक्षाचा मेळावा झाला. पक्षाचे नेते आमदार अबू असिम आजमी (Abu Azmi) यांच्या उपस्थित झालेल्या या मेळाव्याला मोठी गर्दी होती. यावेळी आमदार आझमी यांनी समाजवादी पक्षातर्फे (कै.) आमदार निहाल अहमद यांची कन्या शानेहिंद यांना मालेगाव शहरातून उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाआधीच समाजवादी पक्षाने आघाडीच्या मार्गात अडथळा निर्माण केला आहे.
आमदार आझमी यांनी केंद्रातील भाजप (BJP) सरकारवर सडकून टीका केली. मुस्लिम समाज शिक्षित होत आहे. त्यांच्या विकासासाठी समाजवादी पक्ष लढा देत आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षण तसेच अन्य समस्यांसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आहे. मुस्लिम समाजाला अन्याय, अत्याचार यातून मुक्त करण्याची गरज आहे. केंद्रातील सरकार मात्र बुरखा, वक्फ बोर्ड, मुस्लिम समाजासाठी नवे नवे कायदे आणून त्यांच्या विकासात अडथळे आणत आहे. मात्र समाजातील नवी पिढी हे सर्व षडयंत्र ओळखून आहे. भाजपला योग्य वेळी धडा शिकविला जाईल.
इंडिया आघाडीमुळेच केंद्रातील भाजप सरकारला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. या सरकार विरोधात आम्ही अधिक प्रखर लढा देऊ. समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी झाल्यास मालेगाव शहराचा विकास करू, असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप झालेले नाही. या आघाडीत समाजवादी पक्षाचा समावेश होणार की नाही, याबाबत देखील चित्र स्पष्ट नाही. समाजवादी पक्षाने मुंबईतील काही मतदारसंघ तसेच भिवंडी मालेगाव धुळे आणि औरंगाबाद या मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे.
समाजवादी पक्षाच्या या भूमिकेमुळे हे मतदासंघ सोडताना महाविकास आघाडीला राजकीय समतोल आणि समाधान यासाठी मोठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. काँग्रेससाठी अनुकूल असलेल्या मालेगाव मध्ये मतदारसंघात समाजवादी पक्षाने थेट उमेदवारच जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीतील अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.