Aditya Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aditya Thackeray News : गावितांचे इगतपुरी ‘बायपास’ ठाकरे पोहचले थेट सिन्नरच्या राजाभाऊंकडे!

Arvind Jadhav

उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेल्या आदित्य ठाकरे यांच्या स्वागताची जोरदार तयारी इगतपुरीमध्ये करण्यात आली. मात्र, नाशिकची वेस असलेल्या इगतपुरीची सभा टाळून आदित्य ठाकरे थेट सिन्नरच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे महाआघाडीचे आमदार असलेल्या हिरामण खोसकर यांच्या कार्यक्षेत्राला आदित्य ठाकरेंनी का टाळले, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जोश वाढला आहे. बुधवारी दौऱ्याला सुरूवात होणार होती, त्यामुळे नाशिकच्या वेशीवर आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत करण्यात आले.

माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह समर्थकांनी आदित्य ठाकरेंच्या सभेची तयारी केली होती. सभेस्थळी कार्यकर्ते जमा होत असतानाच आदित्य ठाकरे यांनी सभा टाळण्याचा निर्णय घेत थेट सिन्नर गाठले. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी मार्गदर्शन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत बोलताना माजी आमदार निर्मला गावित म्हणाल्या की, ‘आदित्य ठाकरे थेट रवाना झाले नाहीत. इगतपुरी येथे कार्यक्रमाची वेळ एक वाजताची होती. मात्र, त्यांना पोहचण्यास उशीर झाला. पुढे सिन्नर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला उशीर होऊ नये, यासाठी त्यांनी थेट सिन्नरला जाण्याचा निर्णय घेतला. आम्हालाही तिकडेच बोलवले आहे. यामागे दुसरे कारण नाही. सभेसाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आले होते, याकडे गावित यांनी लक्ष वेधले.

निर्मला गावित या दोन वेळा काँग्रेसकडून आमदार राहिलेल्या आहेत. मात्र, गेल्यावेळी त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे हिरामण खोसकर यांनी मतदार संघाची तडजोड म्हणून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकीटावर खोसकर यांनी मोठा विजय संपादन केला. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासमवेत खोसकर सुद्धा भाजपात दाखल होतील अशी चर्चा होती.

मात्र, आज परदेशातून परत आल्याबरोबर आपण पक्षातच राहणार असल्याचे खोसकर यांनी स्पष्ट केले. या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे काय भूमिका घेतात याकडे इगतपुरीवासीयांचे लक्ष लागलेले असताना सभाच होऊ शकली नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT