Aaditya Thackeray Sinnar Nashik News :
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागावाटप अद्याप झालेले नाही. निवडणुका तोंडावर असताना अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. याबाबत शिवसेनेसह सर्वच पक्ष मीठाची गुळणी धरून बसले आहेत. शिवसेनेच्या (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांनी मात्र सिन्नर विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर करून टाकले. अर्थात पक्षाचे तिकीट उद्धव ठाकरे फायनल करतील, हे सांगण्यास आदित्य ठाकरे विसरले नाहीत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Aaditya Thackeray नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी त्यांनी सिन्नर येथे पहिला संवाद मेळावा घेऊन दौऱ्याची सुरूवात केली. या मेळाव्याच्या आयोजनात जिल्हा प्रमुख विजय करंजकर आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजाभाऊ वाजे यांनी इतर पक्षाचे नेते आणि पदाधिकारी सातत्याने पक्ष बदल करीत असल्याबाबत टीका केली. सिन्नर शिवसेनेत मात्र फक्त इनकमिंग सुरू आहे. आपण द्याल तो उमेदवार, आपण बांधाल ते तोरण आणि सांगाल ते धोरण, असा नारा देत सिन्नर तालुका हा उद्धव ठाकरे यांची साथ कधीच सोडणार नाही, असे आश्वासन वाजे यांनी दिले.
जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनीही शेतकरी प्रश्नावर राज्य व केंद्र सरकारवर आसुड ओढले. आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकास्त्र सोडले.
शेतकऱ्याला शेती परवडत नाही. त्यामुळे नव्या पिढीला शेतकरी शेती करण्यासाठी पुढे येऊ देत नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या जात नाही. पेपर फुटीसारखे प्रकार घडतात. यासाठी आम्ही अत्यंत कडक कायदा करू, असे आदित्य ठाकरे म्हणाले. भ्रष्टाचार असो की घराणेशाही याबाबत भाजपमध्ये जाणाऱ्यांना कोणताच प्रश्न उपस्थित केला जात नाही. भाजप सातत्याने खोटे बोला पण रेटून बोला, ही निती वापरत आहे. मात्र, त्याचा उपयोग होणार नाही. लोक खोट्या प्रचाराला आता बळी पडणार नाहीत, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सिन्नरकर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहात. वाजे सुद्धा असून आगामी विधानसभा निवडणूक ते लढतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. आपण उमेदवारी जाहिर केल्याची बाब लक्षात येताच ठाकरे यांनी तिकीटाचे उद्धव ठाकरे ठरवतात, हे स्पष्ट केले.
माझी खात्री आहे की हा आवाज पुन्हा विधानसभेत पोहचणार, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राजाभाऊ वाजे यांना बळ दिले. राजाभाऊ वाजे यांच्या विधानसभा निवडणुकीबाबत घोषणा करणारे आदित्य ठाकरे यांनी लोकसभेबाबत चुप्पी साधल्याने विजय करंजकर यांच्या उमेदवारीचे काय? अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू झाली.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.