Aditya Thackeray & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aaditya Thackeray Politics: : भुजबळ वीस वर्ष मंत्री, तरी मतदारसंघात पावसाळ्यात पाण्याचे टँकर हे दुर्दैव!

Sampat Devgire

Aaditya Thackeray on Chhagan Bhujbal: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काल मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात मेळावा घेतला. या शेतकरी मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या या मेळाव्याची चांगलीच चर्चा झाली.

शिवसेना नेते ठाकरे यांनी यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना चांगलेच सुनावले. येवल्याच्या जनतेने भुजबळ यांना चार वेळा निवडून दिले. गेली वीस वर्षे भुजबळ सत्तेत आहेत.

राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. मात्र त्यांना येवला मतदारसंघाचा अपेक्षित विकास करता आलेले नाही, याची खंत वाटते. अगदी पावसाळ्यात देखील येवल्यामध्ये प्यायला पाणी नाही. तेथे टॅंकरने पाणीपुरवठा होतो.

रस्ते नाहीत. मग विकास कुठे आहे? याला विकास म्हणतात का? सबंध राज्यात हीच स्थिती आहे. खोके सरकारने राज्याची वाट लावली आहे. शेतकरी आणि उद्योजकांच्या विरोधात हे सरकार काम करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

आदित्य ठाकरे मुंबईहून नाशिकला आणि नाशिकहून येवल्याला आले. यावेळी रस्त्याची अतिशय बिकट अवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. सतत सत्तेत आणि मंत्रीपद भूषविणाऱ्या भुजबळ यांना रस्ताही करता येत नाही, याचे खूप वाईट वाटते, असे त्यांनी सांगितले.

त्यावेळी ठाकरे यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला. कांदा निर्यात बंदी हा नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. त्यावर भुजबळ यांनी काय केले? असा प्रश्न त्यांनी केला.

केंद्र सरकारने आधी गुजरातमधील निर्यात बंदी उठवली. त्यानंतर महाराष्ट्रातील निर्यात बंदी उठविण्यात आली. असे प्रत्येक क्षेत्रात होत आहे. अनेक उद्योग जाणीवपूर्वक गुजरातला पाठविले जात आहेत की काय अशी शंका येते. कोणीही उद्योजक एका उपमुख्यमंत्र्याकडे गेला की, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याला राग येतो. ते नाराज होतात. असा कारभार कसा चालेल. ही उद्योजकांची खंत आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुराशे, महेंद्र पगारे, चंद्रकांत शिंदे, वाल्मीक गोरे, मनीषा वाघ, प्रियंका जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सुभाष निकम, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंगलसिंग परदेशी यांसह विविध महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT