Adv. Nitin Thackray
Adv. Nitin Thackray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MVP News: दर तीन महिन्यांनी शरद पवारांची भेट घेऊ!

Sampat Devgire

नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेचे‍ (MVP) दायित्‍व १४० कोटींपर्यंत (Liablities) पोचले आहे. तीन वर्षांत संस्‍थेवरील जास्‍तीत जास्‍त कर्ज फेडताना (Repayment of loan) दायित्‍व कमी करण्यावर भर राहील. विकास निधीत लक्षणीय वाढ करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवताना संस्‍थेच्‍या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, अशी भावना मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी शनिवारी व्‍यक्‍त केली. (Newly elected General secretary nitin Thackray Visit Sakal Newspaper Office)

‘सकाळ’च्‍या सातपूर कार्यालयात झालेल्या ‘सकाळ-संवाद’ उपक्रमात ते बोलत होते. ‘सकाळ’च्‍या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी पदाधिकाऱ्यांचे स्‍वागत केले.

अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्‍वासराव मोरे, चिटणीस दिलीप दळवी यांच्‍यासह तालुका संचालक लक्ष्मण लांडगे, ॲड. रमेशचंद्र बच्‍छाव, विजय पगार, डॉ. प्रसाद सोनवणे, संदीप गुळवे, नंदकुमार बनकर यांच्‍यासह शिवा पाटील-गडाख, प्रा. डॉ. अशोक पिंगळे आदी उपस्‍थित होते.

अॅड. ठाकरे म्‍हणाले, की कृषी महाविद्यालयाच्‍या विस्‍तारित इमारतीचे बांधकाम सुरू असून, येथे नवीन कृषी महाविद्यालय सुरू करण्यासह बारामती महाविद्यालयाच्‍या धर्तीवर सध्याच्‍या महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी सामंजस्‍य करार करण्याचा प्रयत्‍न असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्‍येष्ठ नेते शरद पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून, दर तीन महिन्‍यांनी त्‍यांना आढावा सादर केला जाईल. सीएसआर निधीतून तसेच विकास निधी वाढवताना संस्‍थेचे दायित्‍व कमी करण्यावर कार्यकारिणीचा भर असेल. या शैक्षणिक वर्षात सुमारे दीडशे कोटींपर्यंत विकासनिधी संकलित करण्याचा प्रयत्‍न असेल. तर तीन वर्षांत ७० ते ८० टक्‍के दायित्‍व कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.

‘ती’ कामे थांबविण्याचे आदेश

यापूर्वीच्‍या कार्यकारिणीकडून अनावश्‍यक बांधकामे व जादा दरांनी जमीन खरेदी केल्‍याची झळ संस्‍थेला सोसावी लागली. आर्थिक शिस्‍त लावण्यासाठी यापूर्वी मंजूर; परंतु सद्यःस्‍थितीत सुरू न झालेली बांधकामे थांबविण्याचे आदेश दिले आहेत. गेल्‍या काही कालावधीत अनावश्‍यक सुमारे साडेतीनशे सेवक नियुक्‍त्‍या केल्‍या असून, यासंदर्भात चौकशी करत लवकर निर्णय घेतला जाईल. प्रत्‍येक टप्प्‍यावर आर्थिक शिस्‍त लावण्यावर भर दिला जाईल. काही सेवकांचे वेतन थकीत असून, दिवाळीपर्यंत ते सुरळीत होण्याच्‍या अनुषंगाने आर्थिक नियोजन आखले जाईल, असेही ॲड. ठाकरे म्‍हणाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT