शेकडो वर्षांनंतर समोर आले अलौकीक आदिपीठातील आदिमायेचं रूप!

खानदेशच्या आदिमाया, आदिशक्ती, अष्टादशभुजा श्री सप्तशृंग निवासिनी देवी नव्या रूपात.
Shree Saptshringi Nivasini Devi
Shree Saptshringi Nivasini DeviSarkarnama
Published on
Updated on

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : सप्तशृंग निवासिनी (Saptshringi Devi) आदिमाया-आदिशक्तीचं त्रिगुणात्मक अष्टादशभुजेतील अतिशय विलोभनीय, (Amazing) ओजस्वी, तेजरूप (Bright) समोर आलं आहे. शेकडो वर्षांनंतर आदिपीठातील आदिमायेचं हे रूप समोर आलं आहे. धार्मिक, आध्यात्मिक, पौराणिक क्षेत्रातील या मोठ्या स्थित्यंतरामुळे श्री सप्तश्रृंग निवासिनी देवीच्या संदर्भात अनेक गोष्टींना आता उजाळा मिळणार आहे. (Khandesh Kuldaivi, mahervashin Saptshringi devi`s temple will soon reopen)

Shree Saptshringi Nivasini Devi
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अडचणीत? न्यायालयात याचिका दाखल

या संदर्भात मोठं संशोधन सुरू झाले आहे. आदिमायेचं हे पीठ अर्धपीठ म्हणून परिचित आहे. पण हे अर्ध नव्हे, तर आदिपीठ असल्याचे दाखले समोर येत आहेत. आदिमायेचं हे देशातील सर्वांत प्राचीन स्थान म्हणून समोर आल्यानं नाशिकचं देशात असलेलं धार्मिक महत्त्व अधिक वाढणार आहे. तज्ज्ञ धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते देवतेचं मूळरूप समोर यावं, याची तजवीज आदिमायेनेच करून ठेवलेली असते. त्यामुळे त्यासाठीच्या योग्य-सयुक्तिक कालखंडाची वाट पाहावी लागते, जो कालखंड आता सुरू आहे.

Shree Saptshringi Nivasini Devi
Navneet Rana| तुमचा माज कमी करा; पोलिस पत्नीने खासदार नवनीत राणांना झापलं...

श्री सप्तश्रृंग निवासिनीचं स्थान किती पुरातन आणि प्राचीन आहे, याचे संदर्भ आता संशोधक शोधून समोर आणत आहेत. देशातील महत्त्वाच्या धार्मिक ग्रंथालयांमध्ये या संदर्भांचा शोध सध्या घेतला जातोय. त्यात जम्मू, बडोदा, काशी, कोलकता येथील ग्रंथालयांचा समावेश आहे. नाशिकचे स्मार्त चुडामणि शांतारामशास्त्री भानोसे हे काशीतील ज्येष्ठ अभ्यासकांच्या मदतीने या प्राचीन संदर्भांचा शोध घेण्यात अग्रेसर आहेत. आदिमाया-आदिशक्तीचं हे रूप म्हणजे नवनाथांची तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची कुलस्वामिनी आहे. पौराणिक संदर्भांमध्ये प्रभू श्रीरामचंद्र सप्तशृंगगडावर येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. संत निवृत्तिनाथ महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी आदिशक्तीची परवानगी घेऊन ते त्र्यंबकेश्वरी समाधिस्त झाले. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी देखील संजीवन समाधीपूर्वी देवीचं दर्शन घेतल्याचे दाखले आहेत.

ज्ञानदेवांनंतर शेकडो वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनीही श्री सप्तशृंग मातेचं दर्शन घेतल्याचे दाखले आढळतात. सप्तशृंग अर्थात, सात पहाडांपैकी एका गडावर छत्रपतींनी सुरतेतून लुटलेलं १७ मण सोनं सुरक्षित ठेवल्याचं मानलं जातं. शिवराज्याभिषेकावेळी हे सोनं रायगडावर नेण्यात आलं होतं.

श्री सप्तशृंग निवासिनी भगवतीचं मूळरूप अशा रीतीनं समोर येईल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. रोजच्या सेवेत असलेल्या पुजारी मंडळींपासून ते ट्रस्टच्या सदस्यांपर्यंत तसेच ग्रामस्थ आणि अन्य मंडळींना याची पुसटशी कल्पना नव्हती. शेंदूर लेपण शास्त्रीय पद्धतीनं काढून आपल्याला देवतेचं पूजन लगेचच सुरू करता येईल, अशी या सगळ्यांची धारणा होती. तथापि, शेंदूर, लाख, मेण आदी तब्बल ११०० किलो सामग्री सुमारे सव्वाफूट मूर्तीवरून काढल्यानंतर मूळरूप समोर आलं. हे मूळरूप इतकं विलोभनीय आणि रेखीव आहे, की ही मूर्ती एका दृष्टिक्षेपात डोळ्यात साठवणं केवळ अशक्य. नाशिक हे धर्मक्षेत्र. धार्मिक, पौराणिक अनेक संदर्भ नाशिकच्या संपूर्ण परिसराला आहेत. त्र्यंबकराज आणि सप्तशृंग ही देशभर मान्यता पावलेली स्थाने इथल्या लौकिकात भर घालतात. आता आदिमाया, आदिशक्तीच्या मूळरूपाचा लौकिकही देशभर वाऱ्याच्या वेगानं पोचेल आणि उपासना, साधना करणारे संत-महात्म्यांचीही पावलं आपसूकच सप्तशृंगगडाकडे आदिमायेच्या दर्शनासाठी वळतील, यात शंका नाही.

आदिमायेचं मूळरूप झाकून त्यावर आवरणरूपी आदिशक्ती स्थापित करण्याची बुद्धी, समयसूचकता तत्कालीन सिद्धपुरुष, संत-महात्म्यांना कुणी दिली असेल, या प्रश्नाच्या अनुषंगानेही शोधकर्ते शोध घेत आहेत. परकीय आक्रमकांपासून मूळ मूर्तीला हानी पोहोचू नये, हा त्यामागील हेतू. यांसह तंत्रशास्त्राच्या अंगानंही देवीच्या मूळरूपातील आयुध, शस्त्र-अस्त्र यांच्या संदर्भातील संशोधनाला गती मिळणार आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये सप्तशृंग भगवतीच्या गडावर विकासकामेही मोठ्या प्रमाणात होतील, अनेक भाविकांना या माध्यमातून शक्ती आणि भक्तीची प्रेरणा मिळेल.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com