Dr. Advay Hiray Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena Politics: ठाकरे गटाच्या अधिवेशनातील बॅनरमधून अद्वय हिरे गायब!

Sampat Devgire

Nashik Political News: शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन येता 22 जानेवारीला नाशिक येथे होत आहे. या अधिवेशनासाठी लावण्यात आलेल्या फलकांवरून पक्षांतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये अधिवेशन आधीच मानापमानाचे नाट्य रंगण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेच्या नाशिक येथे होणाऱ्या अधिवेशनानिमित्त शहरभर स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. पक्षाच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लावलेले या फलकांमध्ये अनेक नेत्यांची छायाचित्रे नाहीत. त्यामुळे याबाबत थेट वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे अधिवेशनाच्या आधीच नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

नाशिक शहरात लावलेल्या शिवसेनेच्या फलकांमध्ये मालेगावचे चर्चित नेते व सध्या पक्षाचे उपनेते असलेले अद्वय हिरे यांचे छायाचित्र नाही. हिरे यांच्यासह ग्रामीण भागातील कुणाल दराडे, नितीन आहेर, गणेश धात्रक या तीन जिल्हा प्रमुखांसह संपर्क नेते जयंत दिंडे यांनाही या फलकांवर स्थान नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते संतप्त आहेत. या संदर्भात काही पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना माहिती देऊन ही बाब लक्षात आणून दिली आहे.

उपनेते अद्वय हिरे हे शिवसेनेत (उद्धव ठाकरे गट) असून त्यांनी पालकमंत्री आणि हिरे यांचे परंपरागत विरोधक दादा भुसे यांना थेट आव्हान दिले आहे. स्थानिक राजकारणात दादा भुसे यांना विविध निवडणुका तसेच राजकीय उपक्रमांमध्ये थेट आव्हान देत भुसे यांची हिरे यांनी चांगलीच कोंडी केली होती.

आगामी विधानसभा निवडणुकीत भुसे यांच्या विरोधात हिरे हे प्रबळ उमेदवारा असल्याने सरकारमधील पद व यंत्रणेचा वापर करून हिरे यांच्याविरुद्ध विविध तक्रारी करण्याचा सपाटाच लावला आहे.

अशाच एका प्रकरणांमध्ये अद्वय हिरे सध्या अटकेत असून त्यांना जामीन मिळू नये, यासाठी राज्य सरकारचे प्रशासन अतिशय तडफेने काम करीत आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे गटाला आव्हान देणाऱ्या नेत्यालाच शिवसेनेच्या फलकावर स्थान नसल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहे. यातून आगामी काळात काही वेगळे निर्णय देखील होण्याची शक्यता आहे.

नाशिक शहरातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सातत्याने शिवसेनेमध्ये गटबाजीचे राजकारण करून काही नेत्यांना बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप आहे. जयंत दिंडे हे जुने जाणते निष्ठावंत नेते असून सध्या संपर्कप्रमुख आहेत. त्यांनाही फलकावर स्थान मिळालेले नसल्यामुळे शिवसेनेचे अधिवेशन प्रत्यक्षात होण्याआधीच नाशिकमध्ये पक्षांतर्गत राजकारण रंगले आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT