Nashik politics : नाशिक जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षात इनकमिंगचा धडाका चालवला आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते गळाला लावल्यानंतर भाजपने आपला मोर्चा आता आपलाच मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडे वळवला आहे. पहिला धमाका भाजपने मालेगाव बाह्य मतदारसंघात केला आहे.
मालेगाव बाह्य मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे. पण भुसेंच्या याच बालेकिल्ल्यात भाजपने मोठा डाव टाकला आहे. दादा भुसेंना शह देण्यासाठी भाजपने विधानसभेला त्यांच्या विरोधात लढलेले अद्वय हिरे व बंडू काका बच्छाव हे दोन्ही उमेदवार गळाला लावले असून त्या पैकी अद्वय हिरे यांचा मंगळवारी (दि.१८) भाजपत प्रवेश झाला.
मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभेचे उमेदवार अद्वय हिरे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. हिरे यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा फटका बसला असून भाजपची ताकद मात्र वाढली आहे. अद्वय हिरे हे दादा भुसे यांचे कट्टर राजकीय विरोधक आहे. विधानसभा निवडणुकीत अद्वय हिरे यांनी दादा भुसे यांना प्रचंड कडवी झुंज दिली होती. अद्वय हिरेंचा निवडणुकीत पराभव झाला असला तरी तीन नंबरची मते अद्वय हिरे यांनी घेतली होती.
तर बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक असलेल्या बंडू काका बच्छाव यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. अद्वय हिरे यांच्यापेक्षाही बंडू काका बच्छाव यांनी जास्त मतदान घेतलं होतं. दादा भुसे यांच्यानंतर दोन नंबरचे मतदान बच्छाव यांनी घेतलं होतं. बंडू काका बच्छाव यांचाही भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. ते २८ नोव्हेंबरला वाजत गाजत भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
भाजपने शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या दोन्ही विरोधकांना पक्षात घेतलं आहे. त्यामुळे भुसेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची ताकद वाढली आहे. आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये भुसेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हिरे यांच्या भाजप प्रवेशामुळे तर पुन्हा एकदा भुसे विरुद्ध हिरे हा राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भाजपने केलेल्या या खेळीने भुसेंच्या सुसाट राजकारणाला कुठेतरी ब्रेक लागेल अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.