Uddhav Thackeray - Sharad Pawar News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray - Pawar News : पवारांनंतर ठाकरेंचीही तोफ जळगावात धडाडणार, शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांची धडधड वाढली

Shivsena - NCP Poliical News : शरद पवारांनी एकीकडे सभांचा धडाका लावला असतानाच आता ठाकरेही मैदानात....

सरकारनामा ब्यूरो

कैलास शिंदे

Jalgaon : राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभ्या फुटीनंतर अजित पवार गटासह भाजपला घेरण्यासाठी खुद्द अध्यक्ष शरद पवारांनी दंड थोपटले आहे. येवल्यानंतर बीडमध्ये पवारांची गुरुवारी जाहीर सभा झाली. शरद पवार यांच्या स्वाभिमान सभा आता संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. येवला, बीडनंतर आता पवारांची सभा येत्या ४ सप्टेंबर रोजी जळगावात होत आहे. पवारांनी एकीकडे स्वाभिमान सभांचा धडाका लावला असतानाच आता ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरेही मैदानात उतरले आहे. पवारांनंतर ठाकरेंची जळगावात सभा होणार आहे.

शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणाची समीकरणं बदलली आहेत. बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेत त्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचा विडा शरद पवारांसह उध्दव ठाकरेंनी उचलला आहे. उध्दव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव, नागपूर येथे सभा घेतल्यानंतर आता त्यांची पुढील सभा जळगावात येत्या १० सप्टेंबरला होत आहे. त्यामुळे पुढील महिन्यात जिल्ह्यात राजकीय धुमाळी असणार आहे.

येवला, बीडमधील सभांना मिळालेला प्रचंड पाहून शरद पवार गटाचा उत्साह चांगलाच दुणावला आहे. त्यातूनच पवारांनी आपल्या पुढील स्वाभिमान सभा जाहीर केल्या आहेत. शरद पवार ४ सप्टेंबरला जळगावात येत आहे. त्या पाठोपाठ शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही १० सप्टेंबरला जळगावात येणार आहे. त्यांची त्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर शरद पवार(Sharad Pawar) प्रथमच जळगावात येत आहेत. त्यांची सागर पार्क मैदानावर जाहीर सभा होणार असल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्या तयारीला लागले आहेत. पवार यांच्या पाठोपाठ शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही जळगावात येत आहेत. १० सप्टेंबर रोजी जळगावात पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण त्यांचे हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिवसेना प्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली.

मुंबई येथे त्यांनी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते.यावेळी जळगाव येथे त्यांची जहिरसभा होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व पाचही आमदार शिंदे यांच्या सोबत गेले आहेत, त्यामुळे आता नवीन आमदार निवडीसाठी पक्षाला मेहनत घ्यावी लागत आहे.

जळगाव येथील राजकीय परिस्थितीचा आढावाही ठाकरे यांनी घेतल्याचे भंगाळे यांनी सांगितले आगामी काळात महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार आहोत. मात्र काही कारणाने आघाडी झाली नाही तर शिवसेना(Shivsena) स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी करत आहे.त्याचाही मतदार संघ निहाय आढावा ठाकरे यांनी घेतला आहे.आता जळगावात होणाऱ्या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील अशी माहिती भंगाळे यांनी दिली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT