Maharashtra cooperative bank scam : भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वात अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा सहकारी बँकेचा कारभार सुरू आहे. एकप्रकारे जिल्हा सहकारी बँकेवर भाजपचं नेतृत्व आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात बँकेत राबवलेल्या 690 जागांच्या भरती प्रक्रियेमुळे बँक आणि बँकेचे नेतृत्व आता चर्चेत आलं आहे. या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणारी याचिका दोन उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली असून, त्याची दखल घेत न्यायालयाने नोटीस बजावण्याचा आदेश काढला आहे.
याचिकाकर्ते उमेदवार विशाल गोरे आणि राजेंद्र वैराळ यांनी बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने त्यांच्या मर्जीतल्या विद्यार्थ्यांना जास्त गुण देऊन मुलाखतीसाठी पात्र केल्याचा गंभीर आरोपासह वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत न्यायालयाचे (Court) लक्ष याचिकेमार्फत वेधले. न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी राज्य सरकार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक मंडळ आणि वर्कवेल इन्फोटेक कंपनीला नोटीस बजावण्याचा आदेश दिला.
बँकेतील (Bank) भरती प्रक्रिया वर्कवेल इन्फोटेक कंपनीमार्फत राबवण्यात आली. ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखती घेऊन अंतिम यादी जाहीर करण्यात आली. याचिकाकर्त्यांना ऑनलाइन परीक्षेतील उत्तरांची यादी प्रसिद्धीनंतर त्यांच्या उत्तरपत्रिकेनुसार कमी गुण मिळाले असल्याचे लक्षात आले. यानंतर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत याचिकाकर्त्यांनी बँकेकडे मागितली. परंतु त्यांना बँकेने प्रत दिली नाही. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाही अर्ज करून निदर्शनास आणून दिले. त्यांनी कार्यवाही केली नाही.
यानंतर विशाल गोरे आणि राजेंद्र वैराळ यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यांनुसार वरील भरती प्रक्रियेमध्ये गुणवत्ता यादी जाहीर करणे गरजेचे होते. बँकेने गुणवत्ता यादी जाहीर न करता, फक्त आसन क्रमांक प्रसिद्ध करून मुलाखत व अंतिम यादी प्रसिद्ध केली. या भरतीमध्ये बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने त्यांच्या मर्जीतील विद्यार्थ्यांना जास्त गुण दिले. ही भरती प्रक्रिया फक्त देखावा असून, बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने त्यांच्या संपर्कातील उमेदवारांना पात्र केलेले आहे.
या भरती प्रक्रियेत आरक्षण लागू केले नाही. सहकारी बँकांसाठी राज्यस्तरीय कृती दलाने दिलेल्या सूचनांचे पालन केलेले नाही. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया बेकायदा असल्याचा आरो याचिकाकर्त्यांनी केला. ही प्रक्रिया रद्द करण्याची विनंती देखील याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली. न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी याचिकाकर्त्यांची दखल घेत, संबंधितांना नोटीस बजावण्याचा आदेश काढला. वकील नीलेश भागवत आणि योगेश खालकर यांनी याचिकाकर्त्यांतर्फे, तर वकील एस. पी. सोनपावले यांनी सरकारतर्फे न्यायालयात काम पाहिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.