BJP Radhakrishna Vikhe 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shani Shingnapur Devasthan scam : मंत्री विखेंची थेट प्रतिक्रिया, 'शनैश्वर'चे विश्वस्त अस्वस्थ; म्हणाले, 'शनिदेवाच्या प्रक्षोभास...'

Ahilyanagar BJP Radhakrishna Vikhe on Nevasa Shani Shingnapur Trust Scam : श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीवर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सूचक प्रतिक्रिया.

Pradeep Pendhare

Ahilyanagar BJP Minister Radhakrishna Vikhe : श्री क्षेत्र शनिशिंगणापूरमधील श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या 500 कोटी रुपयांसह नोकर भरती घोटाळा अन् आणि बनावट ॲपद्वारे शनि भक्तांची फसवणुकीच्या चौकशीवर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचक विधान केले.

मंत्री विखे पाटलांच्या या विधानाने देवस्थानचे विश्वस्त, अधिकारी, गैरव्यवहारात सहभागी असणारे अन् या सर्वांचा पाठिराखा कोण, याची चर्चा रंगली आहे. "या सर्व घोटाळ्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे गैरकारभारात सहभागी असणाऱ्यांना सरकार अन् शनिदेवाच्या प्रक्षोभास सामोरे जावे लागणार आहे", अशी प्रतिक्रिया मंत्री विखे पाटील यांनी दिली.

मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe) जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात संवाद बैठक झाली. माध्यमांशी संवाद साधताना, राज्यातील विविध विषयांवरील राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

विखे पाटील म्हणाले, "यावर्षी पावसाळ्याच्या प्रारंभीच चांगला पाऊस झाला. राज्यातील धरणांची पाणी स्थिती चांगली आहे, परंतु, पावसानंतर पीक ताणले आहे. काही भागात दुबार पेरणी करण्याची वेळ येऊ शकते. धरणातील पाणी खरीप हंगामातील पिकांना देण्यासाठी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाईल". हवामान विभाग, जलसंपदा आणि कृषी (Agricultural) विभागाकडून आढावा घेऊन धरणातील पाणीवाटपाचे नियोजन केले जाईल, असेही मंत्री विखे पाटलांनी सांगितले.

'राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांचे काही वक्तव्य वादग्रस्त ठरले आहेत. त्यांनी संयमाने बोलले पाहिजे. परंतु, उत्साहाच्या भरात काही बोलल्याने काही वक्तव्य वादग्रस्त ठरले आहेत. त्यांनी त्याबाबत खुलासाही केलेला आहे. कृषिमंत्री किंवा इतर मंत्री बदलण्याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही', असे मंत्री विखे पाटलांनी सांगितले.

मुद्दा नसलेले विरोधक

'राज्यातील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या सरकारचे कामकाज जनतेच्या हिताचे आहे. त्यामुळे विरोधकांकडे कोणताही मुद्दा शिल्लक नाही, असा दावा करताना केवळ आरोप केले जात आहेत', असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.

मंत्री कदमांच्या राजीनामावर प्रतिक्रिया

'गृह राज्यमंत्री रामदास कदम यांच्या मुलाच्या बारच्या अनुषंगाने आरोप केले. केवळ आरोपावरून कोणाच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेणे योग्य नाही. चौकशीमध्ये कोणी दोषी आढळला, तर राजीनामा घेणे योग्य आहे. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे किंवा अजेंडा नाही. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राजीनामे मागितले जात आहेत', असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT