Congress Sachin Gujar 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress leader kidnapping case : अपहरणकर्त्यांनी काँग्रेसच्या सचिन गुजर यांच्यावर तीनदा ताणलं पिस्तूल; विवस्त्र करून रस्त्यावर मारहाण, हादरवणारा घटनाक्रम...

Ahilyanagar Congress Chief Sachin Gujar Abducted, FIR Filed Over Gun Threat In Shrirampur : अहिल्यानगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या अपहरणाचा हादरवणारा घटनाक्रम समोर आल्याने श्रीरामपूरात खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Shrirampur crime news : श्रीरामपूर इथले काँग्रेसच्या अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या अपहरणाचा हादरवणारा घटनाक्रम समोर आला आहे. सचिन गुजर यांना बळजबरीने कारमध्ये बसवल्यानंतर कारमधील एकाने त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावलं होतं. संपूर्ण घटनेत सचिन गुजर यांच्यावर तीनदा पिस्तूल रोखण्यात आलं. तसंच विवस्त्र करून त्यांना भर रस्त्यात मारहाण केली. अशी नोंद फिर्यादीतून समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

आरोपींचा नेमका काय हेतू होता, याविषयी आता श्रीरामपूरमध्ये चर्चा सुरू आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ पाहून आपण सचिन गुजर यांना समज देण्यासाठी हा प्रकार केल्याचा दावा स्वतःला हिंदुत्ववादी (Hindutva) म्हणवणाऱ्या संशयित आरोपी चंदू आगे याने एका व्हिडिओद्वारे केला आहे.

काँग्रेसचे (Congress) सचिन गुजर आज सकाळी माॅर्निंग वाॅकवरून घराकडे येत होते. त्यावेळी त्यांच्या मागून आलेल्या कारमधील दोघांनी खाली उतरून, त्यांना बळजबरीने बसून अपहरण करून नेले. त्यांना पुढे नेऊन जबर मारहाण करत रस्त्यावर सोडून दिले. ऐन निवडणुकीच्या काळात हा प्रकार झाल्याने खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी सचिन गुजर यांनी श्रीरामपूर पोलिसांकडे तक्रार दिली असून, अपहरणाचा हादरवणारा घटनाक्रम समोर आला आहे.

सचिन गुजर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, "माॅर्निग वाॅक करून घराकडे येत असताना, मागून कार आली. त्यातून ओळखीचा चंदू आगे आणि त्याचा आणखी एक साथीदार खाली उतरला. या दोघांनी पकडले अन् 'तू आमच्या साहेबांविरुद्ध जास्त बोलतो, तुला जास्त माज आला आहे', अशी बडबड करत मला बळजबरीने कारमध्ये बसवले. कारच्या मागील सिटवर बसवले, त्यावेळी कारमध्ये अगोदरच असलेल्या त्यांच्या तिसऱ्या साथीदाराने माझ्या कानपट्टीवर पिस्तूल ठेवली, अन् याला इथंच ठोकून टाकू, असे म्हटला."

पिस्तूल रोखून मारहाण

चंदू आगे याने त्यावर इथं नको, याला मळीच्या ओढ्याच्या रस्त्याला घ्या, तिथं ठोकू. कार पुढे घेऊन जात असताना, आणखी दोन दुचाकीवरून चंदू आगे याचे साथीदार आले. कार पुढे ओढ्याच्या रस्त्याने दुधाळ वस्तीने पुढे निर्मनुष्य ठिकाणच्या रस्त्यावर नेली. कार थांबवल्यावर तिथं मला खाली उतरवले. बऱ्याच दिवसांपासून तू आमच्या साहेबांविरुद्ध बोलतोय. तू महाराजांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याचे चंदू आगे म्हणत, सहा जणांनी मला मारायला सुरूवात केली. यावेळी कारच्या मागे सिटावर बसलेल्या पुन्हा आपल्यावर पिस्तूल ताणून धरले होते, असे सचिन गुजर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

विवस्त्र करून चित्रीकरण

या मारहाणीवेळी चंदू आगे आणि त्याच्या साथीदारांनी सचिन गुजर यांना विवस्त्र केले. अंगावरचे कपडे काढून अंडरपॅन्टवर रस्त्यावर बसवले. यावेळी देखील सचिन गुजर यांना जबर मारहाण केली. कपडे काढत असताना, एकाने सचिन गुजर यांचे चित्रीकरण केले. सचिन गुजर यांचा मोबाईल देखील फोडून टाकला. यावेळी चंदू आगे याने पिस्तूल रोखणाऱ्याला म्हणाला, ठोकून टाक याला. त्यावेळी आपण मोठ्या मोठ्याने ओरडलो, असे सचिन गुजर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

पत्नीला संपर्क अन् पुतण्याची धाव

चंदू आगेने ठोकून टाकण्याची चिथावणी दिल्यावर, त्यातील एकाने कोणतरी लोक येत असल्याचे म्हटल्यावर चंदू आगे आणि त्याचे साथीदार वाहनं घेऊन पसार झाले. यावेळी तिथं एक महिला रोडने जात होती. तिच्याकडून मोबाईल घेऊन, पत्नीला फोन करून प्रकार सांगितला. यानंतर सचिन गुजर यांचा पुतण्या प्रताप गुजर यांनी घटनास्थळी येऊन, त्याने मला हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, असेही सचिन गुजर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT