

Ahilyanagar municipal election : अहिल्यानगर नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेची शिवसेना गजचालमध्ये दिसते आहे. महायुतीमधील बलाढ्य भाजपसमोर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आव्हान उभं केलं आहे.
भाजपमध्ये नाराज असलेल्यांना शिवसेनेकडून संधी देत, एकनाथ शिंदे यांनी पक्ष विस्ताराची रणनीती आखली आहे. नगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल काही लागो, पण भाजपला महायुतीमध्ये राहून एकनाथ शिंदे यांनी आव्हान देत कोंडी केल्याचं निरीक्षण नोंदवलं जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना (Shivsena) पक्षाने शेवगाव, देवळाली प्रवरा, जामखेड आणि श्रीरामपूर नगरपालिकांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले आहे. पण इथं दिलेले उमेदवार हे पूर्वाश्रमीचे भाजपचे आहेत. भाजपमध्ये कोंडी झाल्याने या नाराज भाजपवासियांनी सरळ एकनाथ शिंदे यांना साद घातली. एकनाथ शिंदे यांनी देखील, लगेचच प्रतिसाद देत एकापाठोपाठ एक नगरपालिकांतील आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित केले.
याशिवाय संगमनेर, श्रीगोंदा आणि नेवाशात देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे केले आहेत. भाजपने बारापैकी दहा पालिकांत नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने सात पालिकात नगराध्यक्षपदासाठी आपले उमेदवार उभे केले आहेत. ही संख्या लक्षात घेतली, तर अहिल्यानगर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांनी कमीत कमी वेळात किती मोठी झेप घेतली, हे लक्षात येते.
नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल काहीही लागो, भाजपतील नाराजांना सोबत घेऊन त्यांना मांडलेला हा डाव पक्ष विस्तारासाठी कमालीचा यशस्वी ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांनी नुसते उमेदवार देऊन शांत न बसता, त्यांच्या प्रचारासाठी प्रचार सभा देखील घेतल्या आहेत. श्रीरामपूर आणि जामखेड इथं एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या.
श्रीरामपूरच्या सभेत त्यांनी विकासाबरोबरच हिंदुत्वाचा जागर केला. तिथं त्यांचे उमेदवार प्रकाश चित्ते यांची लढत थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाजपचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांच्या सोबत आहे. जामखेडमध्ये त्यांच्या उमेदवाराची लढत आमदार रोहित पवार आणि भाजपचे निष्ठावान असलेले विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसोबत आहे.
संगमनेरात आमदार अमोल खताळ आणि नेवाशात आमदार विठ्ठलराव लंघे हे, तर त्यांचेच आमदार आहेत. भाजपच्या गोटातील नाराजांना त्यांचा पक्ष मोठा आधार ठरतो आहे. कारण हिंदुत्व हा या दोन पक्षांतील समान दुवा आहे. नव्याने तिकडे गेलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे यांचा सुखद अनुभव येतो आहे. ते संपर्क करण्यासाठी फोनवर सहज उपलब्ध होतात. उमेदवारांना रसद पुरवून त्यांच्यामागे ठामपणे उभे राहतात. त्यामुळे नव्याने त्यांच्याकडे गेलेला हा नाराजांचा गट खूश आहे. खरे तर महाविकास आघाडीने भाजपचा प्रभाव रोखण्यासाठी पुढे येणं गरजेचे आहे. मात्र, अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीकडून तसं होताना दिसत नाही.
महायुतीचे महत्त्वाचे तीनही पक्ष आपले चिन्ह, या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेपर्यंत नेण्यास प्राधान्य देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार दौऱ्यासाठी बाहेर पडले आहेत. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते अद्याप जाहीर न झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर मंथन करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.