Balasaheb Thorat 2 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat : काँग्रेसमध्ये ‘थोरात पॅटर्न’ अ‍ॅक्टिव्ह! तीन अध्यक्षांची घोषणा; 'स्थानिक'पूर्वी मोठी रणनीती

Congress announces three district presidents Ahilyanagar ahead local body and Assembly elections; Balasaheb Thorat camp gains strong hold : अहिल्यानगरमध्ये काँग्रेसची दीप चव्हाण, सचिन गुजर आणि किरण पाटील यांच्याकडे सूत्रे; भाजप-राष्ट्रवादी-शिवसेनेनंतर काँग्रेसचीही त्रिस्तरीय संघटन रचना, अहिल्यानगर जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण सुरू आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Congress : अहिल्यानगर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठी संघटनात्मक चाल खेळत जिल्ह्यासाठी तीन स्वतंत्र जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेप्रमाणेच आता काँग्रेसनेही जिल्ह्यात त्रिस्तरीय संघटन रचना उभी करत राजकीय समीकरणांना नवे वळण दिले आहे.

काँग्रेसच्या या नव्या नियुक्त्यांनुसार शहर जिल्हाध्यक्षपदी दीप चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्षपदी श्रीरामपूरचे सचिन गुजर, तर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी कर्जतचे किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नियुक्त झालेले तिन्ही नेते हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने जिल्ह्यात ‘थोरात पॅटर्न’ पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काँग्रेसच्या (Congress) पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या नियुक्त्या अधिकृतरीत्या जाहीर केल्या. दीप चव्हाण यांच्याकडे यापूर्वीही शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती. आता सलग तिसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास टाकण्यात आल्याने शहरातील काँग्रेस संघटनेवर त्यांची पकड अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, सचिन गुजर यांच्याकडे यापूर्वी संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी होती. मात्र काँग्रेसने ग्रामीण भागासाठी उत्तर आणि दक्षिण अशी स्वतंत्र विभागणी करत दोन वेगवेगळे जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पक्ष अधिक आक्रमकपणे संघटन वाढविण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झालेले किरण पाटील हे यापूर्वी कर्जत तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. संघटनात्मक कामकाजातील त्यांची शैली आणि ग्रामीण भागातील संपर्क पाहता त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, काँग्रेसने राज्यभर राबविलेल्या ‘संघटन सृजन अभियान’चा परिणाम आता प्रत्यक्ष नियुक्त्यांमधून दिसू लागला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 19 एप्रिलपर्यंत हे अभियान राबविण्यात आले होते. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, संघटनातील बदल आणि नव्या नेतृत्वाच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर पक्षनिरीक्षक शरद राऊत यांनी नव्या नियुक्त्यांचे संकेत दिले होते.

किरण राऊत यांनी त्यावेळी सांगितले होते की, काँग्रेस पक्ष देशभर संघटन मजबूत करण्यासाठी व्यापक स्तरावर मोहीम राबवत असून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून संघटनात्मक बदल केले जातील. त्यानुसार जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आली होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब करत काँग्रेसने जिल्ह्याची नवी टीम जाहीर केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसची ही नवी संघटनात्मक मांडणी आगामी राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारी ठरणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT