Vanchit Bahujan Aaghadi  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aaghadi : भाजपच्या आमदाराचा निरोप धुडकवला; वंचितचा 'झुकेगा नहीं'चा इशारा

Vanchit Bahujan Aghadi alleged reservation violation Ahilyanagar Cooperative Bank recruitment : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकमध्ये आरक्षण डावलून होणाऱ्या नोकर भरतीविरोधात वंचित बहुजन आघाडीने धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Cooperative Bank : आरक्षणाची तरतूद डावलून अहिल्यानगर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेत होत असलेल्या भरतीविरोधात वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली. निर्णय होईपर्यंत, माघार नाही, असा हा इशारा बँकेतील सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

भाजप आमदार तथा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी यावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या बुऱ्हाणनगर (ता. नगर) निवासस्थानी आंदोलनकर्त्यांना बोलवले होते. तसा निरोप धाडला होता. वंचितने सत्ताधाऱ्यांचा हा निरोप धुडकावत, निर्णय होईपर्यंत झुकेगा नहीं, अशी भूमिका घेतली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) केंद्रीय सदस्य तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव, राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते, जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सहकारी बँकेसमोर आंदोलनाला सुरवात झाली आहे. च्यावतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलना प्रारंभ करण्यात आला. आंदोलकांनी सुरवातीला जोरदार निदर्शने केली. बँकेत आरक्षण डावलून होत असलेल्या भरतीच्या निषेधार्थ बोंबा मारल्या.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या (Bank) जाहीर झालेल्या भरतीमध्ये विविध समाज घटकांच्या आरक्षणाची तरतूदीची अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. सरळ भरतीने संविधानाच्या कलम 340, 341, 342कडे दुर्लक्ष करून सामाजिक न्याय तत्त्वाचा भंग केला गेला. सदर भरती बेकायदेशीरपणे संविधानाचे उल्लंघन करून होत असून, समाजातील वंचित घटकावर अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.

जिल्हा बँक हा सरकारचा उपक्रम आहे. त्यामुळे बँकेला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग यांच्याकरिता त्यांच्या सेवकांमध्ये 52 टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. जिल्हा बँकेचे सेवक भरतीचे जे नियम सहकार खात्याकडून मंजूर करून घेतलेले आहेत, त्यात राखीव जागेची तरतूद आहे. या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नसताना जिल्हा बँक यांनी आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याचा घाट घातल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला.

जिल्हा सहकारी बँकेच्या नव्याने जाहीर केलेल्या भरतीमध्ये आरक्षणाची तरतूद रद्द करण्यात आलेली असून, बँकेकडे पाठपुरावा करून देखील कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. बँक प्रशासनकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील कुठलाही खुलासा आणि कुठलीही चर्चा न केल्याने आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आल्याचे म्हंटले आहे.

आमदार कर्डिलेंचा निरोप धुडकवला

आंदोलनस्थळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, संचालक माधवराव कानवडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी यासंदर्भात चर्चेचे आमंत्रण दिल्याचा निरोप दिला. मात्र आंदोलकांनी त्यांचे आमंत्रण नाकारले अन् भूमिकेवर ठाम राहिले. तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आणि सहाय्यक निबंधक गणेश औटी यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र आरक्षणाच्या तरतुदीप्रमाणे जिल्हा सहकारी बँकेत भरती प्रक्रिया राबविण्याचे ठोस आश्‍वासन मिळत नाही. वंचितने आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला. वंचित बहुजन आघाडीचे बेमुदत धरणे चालू राहणार असून, प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार आहेत,असे सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT