Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी मंत्री विखे पाटील-थोरात यांच्या सहमती एक्स्प्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच, तिसरा पर्याय म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके कोणता डाव टाकतात याकडे लक्ष लागले आहे.
खासदार लंके यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. आता थोरातांचे जावई बँकेचे नवनिर्वाचित संचालक रणजीत देशमुख आणि खासदार लंकेंची भेट झाली. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची उद्या (गुरूवारी) निवड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची उद्या (गुरुवारी) निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई तथा बँकेचे नवनिर्वाचित संचालक तथा जावई रणजीत देशमुख यांनी आज सुपा (ता. पारनेर) येथील विश्रामगृहावर खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये चर्चा झाल्याचेही देखील समोर येत आहे.
जिल्हा बँकेच्या (DCC Bank) सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चेअरमन पदाच्या निवडीपूर्वी झालेल्या या चर्चेत नेमके कोणते राजकीय गणित मांडले गेले? बँकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी खासदार लंकेंनी संगमनेर येथे हजेरी लावत थोरातांची भेट घेतली होती. त्यानंतर थोरातांचे जावई खासदार लंकेंच्या भेटीला आले, ते कोणता निरोप घेऊन आले होते का? अशा चर्चांना आता तोंड फुटले आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीनिमित्ताने कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात एकत्र आले होते. मंत्री विखे पाटील-थोरात यांच्या सहमती एक्स्प्रेने सुरवातीला बँकेच्या 21 पैकी 10 जागा बिनविरोध करत सत्तेच्या दिशेने कुच केली होती. या सहमतीविरोधात भाजपचे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके यांनी लंगडे पॅनल दिले होते.
राम शिंदे यांनी एक जागा बिनविरोध करण्यात यश मिळवले. पुढे दहा जागांवर झालेल्या निवडणुकीत, खासदार नीलेश लंके, राम शिंदे यांचा एक उमेदवार आणि एक अपक्ष यांचा विजय झाला. उर्वरीत जागांवर सहमती एक्स्प्रेसने विजय मिळवला. जिल्हा बँकेत आता सहमती एक्स्प्रेसकडे 17 जागा आहेत. त्यातील एक अपक्ष सहमती एक्स्प्रेसमध्ये सामील झाला आहे. म्हणजेच, मंत्री विखे पाटील-थोरात यांच्याकडे आता 18 संचालक झाले आहे.
मंत्री विखे पाटील-थोरात यांच्या सहमती एक्स्प्रेसमध्ये 18 जागांपैकी 11 जागा थोरातांचे, तर उर्वरीत सात जागा विखे पाटील यांच्याकडे आहे. आता या सहमती एक्स्प्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. विखे पाटील अन् थोरात गटात अध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे उद्याच्या निवडीत कोणाचा नाव निश्चित होते, याकडे लक्ष लागले आहे. थोरात गटाकडून त्यांचे जावई रणजीत देशमुख यांचे नाव चर्चेत आहे. त्या खालोखाल माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे देखील नाव चर्चेत आहे.
यातच खासदार लंके यांनी काही दिवसापूर्वी थोरातांची भेट घेणे, पुढे थोरातांचे जावई रणजीत देशमुख यांनी खासदार लंकेंची भेट घेणे, यावरून खासदार लंकेंकडे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी कोणता निरोप पोहोचवण्यात आला? याची चर्चा आहे. मंत्री विखे पाटील यांच्या गटाकडून भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डाॅ. सजुय विखे पाटील, भाजप आमदार मोनिका राजळे, सचिन जगताप यांचे देखील नाव चर्चेत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.