Sujay Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar DCC Bank Chairman Election : संख्याबळ थोरातांचे, अध्यक्षपदाचा रिमोट फडणवीसांच्या हाती? सुजय विखेंच्या विधानाने जिल्हा बँकेत नवा ट्विस्ट!

Who will become Ahilyanagar District Bank chairman? Sujay Vikhe says CM Devendra Fadnavis will decide, despite Balasaheb Thorat group numerical strength : 13 संचालकांच्या जोरावर थोरात गटाचा अध्यक्षपदावर दावा; मात्र मुख्यमंत्री फडणवीसच अंतिम निर्णय घेणार असल्याचे सुजय विखेंनी पुन्हा ठणकावले

Pradeep Pendhare

Ahilyanagar District Cooperative Bank : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत विखे पाटील-थोरात सहमती एक्स्प्रेसमध्ये 17 जागांवर यश मिळाले असून एक अपक्ष देखील बरोबर आला आहे. सहमती एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक 12 जागा घेऊन थोरात गटाचे वर्चस्व आहे. अपक्ष असलेला संजीवनी शिंदे-गायकर या देखील थोरात गटाच्याच मानल्या जातात. त्यामुळे सहमतीत थोरात गटाकडे जिल्हा बँकेत 13 जागा होत, अध्यक्षपद त्याच गटाकडे जाईल, असे सांगितले जात आहे.

तत्पूर्वीच भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना बँकेच्या अध्यक्षपदाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात असल्याची आठवण करून दिली. काँग्रेस ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात तिथे कोणती भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) म्हणाले, "राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या सुरूवातीलाच सांगितले होते, मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी ज्याच्या नावावर शिक्कामोर्तब करतील, ते आम्हाला मान्य राहील."

जिल्हा बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीच्या पहिल्या दिवशी देखील तेच सांगितले होते, आणि आता देखील तेच वाक्य आहे की, जिल्हा स्तरावर ज्येष्ठ नेते एकत्रित असले, तरी मुख्यमंत्री फडणवीसच जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचे नाव निश्चित करतील, याची आठवणही सुजय विखे पाटलांनी करून दिली.

जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सुरूवातीला प्रयत्न केले. यासाठी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एकत्र येत, सहमती एक्स्प्रेसवर शिक्कामोर्तब केला. त्यातून सुरवातीला 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या. दहा जागांवर मात्र निवडणूक झाली.

भाजप विधान परिषदेचे प्रा. राम शिंदे यांच्या दोन आणि खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा बँकेत पहिल्यादांच प्रवेश केला. जिल्हा बँकेत सहमती एक्स्प्रेसकडे 17 आणि अपक्ष एक, अशा 18 जागांवर बहुमत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची आणि उपाध्यक्षपदाची माळ कोणच्या गळ्यात पडणार? ज्येष्ठ नेते थोरात कोणती भूमिका घेणार? याकडे आता जिल्ह्यातील सहकाराचे लक्ष लागले आहे.

सुजय विखे पाटलांनी पुन्हा आठवण करून दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री ठरवतील तोच अध्यक्ष विराजमान होणार का? थोरात गट वेगळी भूमिका घेणार? जिल्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून पुन्हा एकदा जिल्हा सहकारी बँकेचे राजकारण ढवळून निघणार हे मात्र तेवढचं नक्की!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT