

Ahilyanagar District Central Cooperative Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू होत आहे. तत्पूर्वी गेल्या 12 तासांत जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.
यात नेहमीप्रमाणे भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु त्यांनीच ज्यावेळी अध्यक्षपदाचे नाव घोषित होईल, त्यावेळी सर्वांनाच धक्का बसेल, अशी प्रतिक्रिया देत, अध्यक्षपदाची उत्सुकता वाढवली आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांचे नाव चर्चेत आहे. त्यावर बोलताना, "कोणतीही निवडणूक आली की, माझे नाव चर्चेत येते. यावेळीही जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आहे. तसे माध्यमांनी नाव चर्चेत ठेवले. पण विश्वासाने सांगतो की, ज्या वेळी अध्यक्ष पदाचे नाव घोषीत होईल, तेव्हा सर्वांनाच धक्का बसेल," असे विखे पाटील यांनी म्हटले.
जिल्हा बँक (DCC Bank) ही जिल्ह्यातील महत्त्वाची बँक आहे. शेतकरी, कष्टकरी, दूध उत्पादक अन् कारखानदारांची आर्थिक संस्था आहे. ही अधिक भक्कम व्हावी, यासाठी प्रयत्न आहे. हा आधारस्तंभ अधिक मजबूतीवर सहकार विकास पॅनलचा निर्धार आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासात तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये बँकेची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे डाॅ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेच्या 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात दहा जागांवर मतदान झाले असून, त्याची मतमोजणी सुरूवात होत आहे. तत्पूर्वी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोण याची चर्चा रंगली आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची चर्चा डाॅ. सुजय विखे पाटील यांच्याभोवती रंगली आहे. तसेच उपाध्यपद काँग्रेसचे बाळासाहेब थोरात गटाकडे किंवा अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गटाकडे जाईल, असे सांगितले जात आहे.
अध्यक्षपदासाठी महिलांची नावे देखील चर्चेत आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि जिल्हा बँकेत बिनविरोध निवड होऊन गेलेल्या राजश्री घुले पाटील यांचेही नाव चर्चेत आहेत. त्याखालोखाल भाजप आमदार मोनिका राजळे यांचे देखील नाव चर्चेत आहेत. विखे पाटील-थोरात सहमती एक्सप्रेसमधील जाणकारांच्या अंदाजानुसार अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे नाव निश्चित झाले असून, ते जाहीर करणे बाकी राहिले आहे. यासाठी डाॅ. सुजय विखे पाटील यांनी, सर्वांना धक्काच बसेल, असे अध्यक्षपदाचे नाव असेल, याचा दाखला दिला जात आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचे नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित करतील, असे महायुतीमधील नेते सुरूवातीला म्हणायचे. परंतु अहिल्यानगरच्या राजकारणात विखे पाटील-थोरात यांची सहमती एक्सप्रेसनंतर ही गणिते स्थानिक पातळीवरच राहिली. भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी देखील माघार घेतली. या सहमतीनंतर अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी मुख्यमंत्र्यांकडे जाणार का? थोरातांची काय भूमिका असणार? विरोधी सहकार परिवर्तन पॅनला शरद पवारांचे बळ मिळाले का? अशा प्रश्नांचा उलगडा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर होईल. अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक ही राजकीयदृष्ट्या पेल्यातील वादळच ठरले!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.