Nilesh Lanke Balasaheb Thorat Meeting : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मंत्री विखे पाटील-थोरात सहमती एक्स्प्रेसमध्ये बाहुबली असलेले, काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी भेट घेतली.
संपूर्ण निवडणुकीत आमने-सामने न आलेले दोन्ही नेते निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र आल्याने, जिथे बँकेच्या बिनविरोधची पहिली बैठक झाली, तिथेच संगमनेरमध्ये ही भेट झाली. या भेटीमागे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीचे संदर्भ जोडले जात आहे.
भाजप (BJP) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी भाजप विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती. या भेटीमागे अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. यातच राम शिंदे यांनी आम्ही दोघे एकाच पक्षात आहोत. त्यांनी बाळासाहेब थोरातांना जवळ केले. मी स्वपक्षीय असल्याने लांबे गेलो असेल. भविष्यात राजकारण करायचे असल्याने आता त्यांच्याबरोबर जे आहेत ते भविष्यातील राजकारणात त्यांच्याबरोबर नसतील. भविष्यात आम्ही बरोबर असणार आहोत, ही त्यांची भूमिका चांगली आहे, असे राम शिंदे यांनी या भेटीमागील राजकारण सांगितले. परंतु माझे दोन संचालक बँकेत पाठवून माझी ताकद दाखवून दिली, असेही राम शिंदे यांनी सांगितले.
मंत्री विखे पाटील-राम शिंदे यांच्या भेटीला काही तास जात नाही तोच, बाळासाहेब थोरात-खासदार लंके यांची भेट संगमनेर येथे झाल्याचे समोर आले. या भेटीलाही बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीमुळे महत्त्व आले आहे. खासदार लंके (Nilesh Lanke) यांनी विजयानंतर, बाळासाहेब थोरात यांच्याविषयी ते आमचे नेते आहेत. आजही आणि उद्याही राहतील, पदाधिकारी निवडीसाठी थोरातांची भेट घेऊ, असे सांगून तिसरा पर्यायाचे सूचक संकेत दिले होते.
थोरात-लंके यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून हे दोघे नेते आमने-सामने आले नव्हते. बिनविरोधच्या निवडणुकीत मंत्री विखे पाटील-थोरात यांच्या सहमती एक्स्प्रेसमध्ये खासदार लंके कुठेच नव्हते. बिनविरोधच्या बैठकींना खासदार लंके नव्हते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून बरोबर असलेले हे दोघे नेते बँकेच्या निवडणुकीत एकत्र नसल्याने, दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. पण निवडणुकीनंतर हे दोघे नेते एकत्र आल्याने, तिसरा पर्यायाच्या चर्चांना उधाण आले आहे.
मंत्री विखे पाटील-थोरात पॅनेलमधील विजयी संचालकांपैकी 13 संचालक थोरातांचे, तर पाच संचालक मंत्री विखे पाटलांचे आहेत. म्हणजेच, थोरातांकडे सहमती एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक संचालक असल्याने ते बाहुबली ठरत आहेत. यातच अध्यक्षपदावर भाजपच्या नेत्यांचेच नाव समोर येत आहे. यात थोरात गटाकडून ज्यांची नावे समोर आहेत, ते स्पर्धेत कितपत टिकणार? त्यांना देशात आणि राज्यात सत्तेत असलेली भाजप कितपत संधी देणार? द्यायची तर सत्ताधारी भाजप ऐकणार का? असे अनेक प्रश्न आहेत. याशिवाय भाजपचे स्थानिक नेते, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपण सत्तेत असून, सहमती एक्स्प्रेसमध्ये मंत्री विखे पाटील गटाचे संख्याबळ कमी असले म्हणून काय झाले, का म्हणून विरोधकांना अध्यक्ष-उपाध्यक्षपदावर संधी द्यायची? असा प्रश्न करत खासगीत चर्चा करत बसले आहेत.
या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर थोरात-लंके यांच्या भेटीमागे काय? अशा एकच प्रश्नावर चर्चा सुरू झाल्या आहेत. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड 12 नोव्हेंबरला होत आहेत. त्याच दिवशी खासदार लंके यांनी त्यांच्या हंगा (ता. पारनेर) येथे दिवाळी फराळ आणि स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम देखील 12 नोव्हेंबरलाच आयोजित केला आहे. या योगाची देखील चर्चा आहे.
मतदानापूर्वी राम शिंदे आणि खासदार लंकेंच्या भेटी वाढल्या होत्या. बंद दाराआड चर्चा देखील झाल्या होत्या. खासदार लंकेंनी जिल्हा बँकेतील नाराजांची फौज घेऊन शरद पवार यांच्या दरबारी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर राम शिंदे यांच्याशी भेटीगाठी वाढल्या होत्या. पण जवळचे असलेल्या थोरातांना काहीसे दूर ठेवले होते. थोरात-लंकेंच्या रणनीतीचा भाग होता का? या देखील चर्चा या भेटीवर होऊ लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.