Ahilyanagar District Cooperative Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत वेगवान राजकीय घडामोडी घडत आहे. निवडणुकीचे चित्र उद्या सोमवारी काहीअंशी स्पष्ट होत असतानाच, पुन्हा एकदा थोरात-विखे पाटील-गडाख विरोधक एकत्र आले आहेत.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांच्या बालेकिल्ल्यात सोनई इथल्या आमराईत, या तिघा दिग्गजांमध्ये तब्बल दोन तासांपेक्षा अधिक काळ चर्चा झाली. उद्या सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने, ही बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यात सोनई येथे तब्बल दोन तासांपेक्षा अधिक काळ चर्चा झाली. जिल्हा बँकेसाठी बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर अमृतकुटीवर सर्वपक्षीय बैठक झाली होती. या बैठकीलाही सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली. या बैठकीची जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात एकच चर्चा झाली.
संगमनेरमधील सर्वपक्षीय बैठकीवर भाजप (BJP) विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. या बैठकीनंतर, एकनाथ शिंदे शिवसेनेने स्वतंत्र बैठक घेत, तिसरा पर्याय देणार असल्याचे संकेत दिले. ही धुसफूस सुरू असतानाच, राम शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीचा नेता म्हणून नेमकी काय भूमिका आहे, स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
राम शिंदे यांच्या मागणीनंतर मंत्री विखे पाटील अन् राम शिंदे जामखेडमध्ये एकत्र आले होते. मंत्री विखे पाटील यांनी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बरचं काही घडायचं आहे. ते होऊ द्या, आम्ही एकत्र बसू. शिंदे काही नाराज नाहीत, असे स्पष्ट केले. मंत्री विखे पाटील यांनी हे स्पष्टीकरण देत असतानाच, पुन्हा बाळासाहेब थोरात, सुजय विखे पाटील आणि शंकरराव गडाख सोनई (ता. नेवासा) येथे एकत्र आल्याचे समोर आले आहे.
थोरात, विखे पाटील यांची वाहने गडाख यांच्या आमराईत दाखल होताच, ही माहिती बाहेर पडली. हे तिघे नेते जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सोनईत एकत्र आले होते. या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अजून काही समोर आलेला नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणता राजकीय रंगमंच उभा राहणार, हे उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच स्पष्ट होईल. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी वारंवार एकत्र येत असल्याने, जिल्ह्याचा आगामी काळात राजकीय पट बदलणार असे संकेत मिळू लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.