

Nilesh Lanke nomination Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय हालचाली सुरू असतानाच आता निवडणुकीतील नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. दोन्ही नेत्यांनी एकाच दिवशी अर्ज घेतल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात ‘तिसरा पर्याय’ आकाराला येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आले असताना त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंद्यातील नेते दत्तात्रय पानसरे देखील उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीच्या काळात पानसरे यांच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते लंके यांच्यासोबत दिसल्याने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह विविध नेते या बैठकीला उपस्थित होते.
मात्र, प्रा. राम शिंदे आणि खासदार नीलेश लंके या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक खरोखरच बिनविरोध होणार की प्रत्यक्ष निवडणुकीत राजकीय संघर्ष पाहायला मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. थोरात यांनी मात्र शिंदे आणि लंके यांच्याशी संवाद सुरू असल्याचे स्पष्ट केले होते.
राम शिंदे आणि नीलेश लंके यांच्या बैठकीतील अनुपस्थितीमागे विखे पाटील पिता-पुत्रांशी असलेल्या राजकीय मतभेदांची पार्श्वभूमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातील भाजपमधील राजकीय मतभेद यापूर्वीही चर्चेत राहिले आहेत. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीपासून नीलेश लंके आणि विखे पाटील यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यामुळे संगमनेरमधील बैठकीपासून दोन्ही नेते दूर राहिल्याची चर्चा असली, तरी याबाबत संबंधित नेत्यांकडून अशी अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
सर्वपक्षीय बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी राम शिंदे आणि नीलेश लंके यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज घेतल्याने राजकीय चर्चेला आणखी वेग आला. अर्ज घेतल्यानंतर राम शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केला. जिल्हा बँकेसंदर्भात बैठक होत असेल आणि त्याची माहिती पालकमंत्र्यांना नसेल, तर त्याबाबतची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वतंत्र बैठक घेतल्याचा संदर्भ देत, विधान परिषदेचा सभापती म्हणून महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी आपल्याला भूमिका पार पाडावी लागेल, असे सूचक विधानही राम शिंदे यांनी केले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राम शिंदे आणि नीलेश लंके यांनी एकाच दिवशी अर्ज घेतल्याच्या ‘टायमिंग’ची सहकार आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. जिल्ह्याच्या पारंपरिक सहकार राजकारणात हे दोन्ही नेते तुलनेने नवे चेहरे आहेत. राम शिंदे आणि नीलेश लंके सार्वजनिक आणि निवडणुकीच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय असले, तरी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील त्यांची सक्रियता नव्या राजकीय समीकरणांना जन्म देऊ शकते.
राम शिंदे आणि नीलेश लंके हे जिल्ह्यातील पारंपरिक सहकारी संस्था किंवा साखर कारखान्यांच्या नेतृत्वातून पुढे आलेले नेते नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या प्रस्थापित सहकार राजकारणासमोर त्यांच्या माध्यमातून स्वतंत्र राजकीय पर्याय उभा राहू शकतो का, याची चर्चा सुरू झाली आहे. यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वतंत्र बैठक घेत महायुतीतील प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणातील काही गटही विद्यमान समीकरणांबाबत अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राम शिंदे, नीलेश लंके आणि नाराज गटांच्या पुढील हालचाली महत्त्वाच्या ठरणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.