Ahilyanagar DCC Bank Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी 369 अर्ज; गडाख बिनविरोध निश्चित, घुलेंसमोर पेच, विखेंसमोर घोगरेंचे आव्हान, तर थोरातांच्या जावयाचा मार्ग सोपा?

369 nominations filed for 21 seats, intensifying political competition across Ahilyanagar : 21 जागांसाठी विक्रमी अर्ज; विखे, कर्डिले, लंके, राजळे, तनपुरे यांच्या मतदारसंघातही राजकीय चुरस

Pradeep Pendhare

Ahilyanagar District Bank Election 2026 : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी तब्बल 369 इतक्या विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाले. उमेदवारीसाठी एकूण 903अर्जांची विक्री झाली होती.

प्राथमिक सेवा संस्थेच्या नेवासा मतदारसंघातून शंकरराव गडाख यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर त्यांचे व्याही माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्यापुढे बिनविरोध निवडीसाठी पेच निर्माण झाला आहे.

नेवाशातून माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांचे एकट्याचे चार अर्ज दाखल झाले आहेत. या मतदारसंघात 130 मतदार आहेत. गडाखांची बिनविरोध निवड निश्चित झाली असतानाच त्यांचे व्याही चंद्रशेखर घुले यांच्यासह त्यांच्या पत्नी राजश्री घुले या दोघांचा अर्ज सेवा सोसायटीच्या शेवगाव मतदारसंघातून दाखल झालेला आहे. भारतीय रिझर्व बँकेने सहकारी बँकांसाठी सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक म्हणून राहता येणार नाही, असे बंधन टाकले आहे. त्यामुळे आज होत असलेल्या छाननी प्रक्रियेत चंद्रशेखर घुले यांच्या अर्जावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

चंद्रशेखर घुले यांचा अर्ज भारतीय रिझर्व बँकेच्या निकषावर अवैध ठरल्यास, त्यांची पत्नी राजश्री घुले यांची उमेदवारी कायम राहते. अन्यथा त्यांची उमेदवारी मागितली जाईल व चंद्रशेखर घुले यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होईल. असा पेच अकोल्याचे सीताराम गायकर आणि कर्जतचे अंबदास पिसाळ यांच्या पुढेही सलग दहा वर्ष संचालक राहिल्यामुळे निर्माण झालेला आहे.

सेवा सोसायटीच्या संगमनेर मतदारसंघातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे जावई रणजितसिंह देशमुख यांच्यासह एकूण चार जणांचे उमेदवारी अर्ज आहेत. त्यात तीन अर्ज रणजितसिंह यांचेच असून, एकमेव विरोधी अर्ज चित्रा गायकवाड यांचा आहे. त्यामुळे रणजितसिंह याचा बिनविरोध निवडीचा मार्ग जवळपास मोकळा होताना दिसतो आहे.

विखेंच्या मार्गात एकनाथ घोगरे

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील प्रमुख दावेदार मानले जाणारे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात एकनाथ चंद्रभान घोगरे यांनी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय भास्कर खर्डे यांचाही अर्ज असल्याने विखे गटाला आता या मतदारसंघात राजकीय 'फिल्डिंग' लावावी लागणार आहे.

अकोले, श्रीगोंदा, कर्जतमध्ये सर्वाधिक इच्छुक

सोसायटी मतदारसंघात सर्वाधिक चुरस आहे. अकोले, श्रीगोंदा आणि कर्जत येथे सर्वाधिक इच्छुक दिसत आहे. अकोलेमध्ये तब्बल 19, श्रीगोंद्यात 16, तर कर्जत मतदारसंघात एका जागेसाठी 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

नगरमध्ये कर्डिले यांच्या विरोधात हराळ, शेळके

नगर तालुका सोसायटी मतदारसंघात आमदार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक बाळासाहेब हराळ आणि प्रताप शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हराळ यांना सभापती राम शिंदे, तर शेळके यांना खासदार नीलेश लंके यांची साथ असल्याचे मानले जात आहे.

पारनेरमध्ये खासदारांविरोधात आमदार

पारनेर तालुका सोसायटी मतदारसंघात खासदार नीलेश लंके यांच्या विरोधात आमदार काशिनाथ दाते यांच्यासह संचालक गितांजली शेळके आणि राहुल शिंदे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील हा मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.

राजळेंना ढाकणेंचे, तर तनपुरेंना कदमांचे आव्हान

पाथर्डी तालुका सोसायटी मतदारसंघात आमदार मोनिका राजळे यांच्यासमोर ऋषिकेश ढाकणे यांनी आव्हान उभे केले आहे. याशिवाय कडूचंद्र शेटे यांनीही अर्ज दाखल केला आहे. राहुरीमध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह हर्ष तनपुरे आणि सत्यजित कदम यांनी अर्ज दाखल केले आहेत. राहुरीत सरळ-सरळ राजकीय पेच निर्माण झाल्याने चुरस आहे.

श्रीरामपुरात ससाणे गटाची कसोटी

श्रीरामपूर सोसायटी मतदारसंघात करण ससाणे यांचा प्रमुख अर्ज मानला जात असून त्यांच्या विरोधात सोन्याबापू शिंदे, रणजित बनकर आणि सोपानराव राऊत यांनी अर्ज दाखल केले आहेत. श्रीरामपूरमध्येही माघारीच्या टप्प्यात कोणते राजकीय गणित जुळणार याकडे लक्ष लागले आहे.

आजोबा आणि नातवाची उमेदवारी

ओबीसी मतदारसंघातून श्रीरामपूर तालुक्यातून ज्येष्ठ नेते तथा बँकेचे माजी संचालक भानुदारस मुरकुटे यांच्यासह त्यांचा नातू निरज मुरकुटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे. या ठिकाणी कोणाचा अर्ज राहणार आणि कोण माघार घेणार याकडे लक्ष राहणार आहे.

आमदार काळेंसह 36 अर्ज

शेतीपूरक व शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघात आमदार आशुतोष काळे यांच्यासह राजेंद्र नागवडे, वैभव पिचड, हर्षदा काकडे यांच्यासह एकूण 36 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही माघारीसाठी मोठी राजकीय रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

बिगरशेती मतदारसंघात तब्बल 54 अर्ज

बिगरशेती मतदारसंघात सर्वाधिक 54 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सचिन जगताप, प्रतापसिंह पाचपुते, शिक्षक नेते रावसाहेब रोहकले, प्रतिभा पाचपुते यांच्यासह 54 इच्छुकांचा समावेश आहे. त्यामुळे या मतदारसंघातील माघारीकडे सर्वांचे विशेष लक्ष राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT