

Ahilyanagar District Central Cooperative Bank : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची चर्चाही पुन्हा ऐरणीवर आली आहे.
मात्र, बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होणाऱ्या संभाव्य समझोत्यावर अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय अवलंबून राहणार आहे.
सोमवारी (5 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा बँक (DCC Bank) निवडणुकीसाठी मोठी गर्दी झाली. अनेक उमेदवारांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. सुजय विखे पाटील यांच्यासह राहुरीचे आमदार अक्षय कर्डिले, श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते, पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिका राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, संगमनेरचे रणजित देशमुख व गणपतराव सांगळे आणि अकोल्याचे अमित भांगरे यांच्यासह प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दाखल झालेल्या अर्जांची छाननी मंगळवारी (6 ऑक्टोबर) होणार आहे.
सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीपेक्षा त्यांच्या संभाव्य भूमिकेचीच चर्चा अधिक रंगली आहे. त्यांच्या नावाभोवती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सुजय विखे पाटील उपस्थित होते. त्यामुळे सचिन जगताप यांच्या नावाची उपाध्यक्षपदासाठीही चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप व पदांबाबत कोणता फॉर्म्युला ठरतो, यावर पुढील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार आहेत.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेत संगमनेरमध्ये बैठक घेतली होती. या बैठकीला सुजय विखे पाटीलही उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतर महायुतीमध्ये राजकीय नाराजी उफाळून आली. भाजपचे नेते राम शिंदे आणि खासदार नीलेश लंके यांनी बैठकीबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
राम शिंदे यांनी महायुतीतील नेते म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी राम शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर केल्याचे सांगण्यात आले. यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे, तर महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात निर्णय घेतील, असे चित्र निर्माण झाले. कोणत्याही घटकाला दूर ठेवले जाणार नाही, असे सुजय विखे पाटील यांनीही स्पष्ट केले होते.
दरम्यान, राम शिंदे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेताना घटनात्मक सभापतीपदाची गरिमा राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. मात्र, कार्यकर्त्यांना निवडणुकीत अधिक गतीने आणि ताकदीने बळ देण्याचे संकेतही त्यांनी दिले. राम शिंदे यांच्या या भूमिकेमुळे ते महायुतीच्या जिल्हा बँक निवडणुकीतील निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट झाले.
राम शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर लगेचच सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीच्या मैदानात प्रवेश केला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणाला आणखी वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सोनई येथील आमराईत बाळासाहेब थोरात, सुजय विखे पाटील आणि शंकरराव गडाख यांच्यात बैठक झाल्याची राजकीय चर्चा आहे. या बैठकीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांशी या भेटीचा संबंध जोडला जात आहे.
सुजय विखे पाटील यांची उमेदवारी, बाळासाहेब थोरात यांच्यासोबतची बैठक आणि महायुतीतील नेत्यांमध्ये सुरू असलेली चर्चा पाहता, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी सुजय विखे पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मात्र, अध्यक्षपदाचा निर्णय केवळ एका पक्षाच्या भूमिकेवर होणार नसून महायुती-मविआमधील संभाव्य बिनविरोध फॉर्म्युला, जागावाटप आणि पदांच्या वाटपावर तो अवलंबून राहणार आहे. त्यामुळे 6 ऑक्टोबरच्या छाननीनंतर आणि त्यानंतरच्या माघारीच्या टप्प्यात जिल्हा बँकेचे अंतिम राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.