Ahilyanagar cooperative politics : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीसाठीचा आज शेवटचा दिवस असून, काही तास उरले आहेत. दसरा मुहूर्तावर झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे सीमोल्लंघन झाले.
सोसायटी मतदारसंघातील जागांचा तिढा स्थानिक पातळीवर नेत्यांनी आपापसात चर्चा करून सोडवून, एक उमेदवार निश्चित करण्यासह राखीव सात जागांबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात एकत्रित उमेदवार देण्याचा निर्णय कालच्या बैठकीत झाला. त्यामुळे आज दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हा बँकेच्या किती जागा बिनविरोध होणार याबाबत उत्सुकता आहे.
जिल्हा बँकेच्या (DCC Bank) काही जागांबाबत तिढा असून, त्यावर चर्चा करून आज बुधवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 12 वाजता बँकेच्या नवनिर्वाचित 21 संचालकांची नाव जाहीर करतील. त्यानंतर ज्यांची नावे या यादीत नाही त्यांनी तातडीने आपली उमेदवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मागे द्यावी, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्यादृष्टीने मंत्री विखे (Radhakrishna Vikhe Patil) व थोरात यांच्यात सहमती एक्सप्रेस झाली होती. मात्र, सभापती शिंदे व खासदार नीलेश लंके यांनी निवडणुकीचा आग्रह धरला होता. त्यादृष्टीने वेगळ्या हालचाली देखील सुरू होत्या. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.
बँकेच्या निवडणुकीसाठी तब्बल 240 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यात नेवासा व संगमनेर अर्ज छाननीत बिनविरोध झाले होते. उर्वरित 19 जागांसाठी 239 उमेदवार राहिले. त्यातही सोमवारपर्यंत अवघ्या 22 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 217 उमेदवार रिंगणात राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध कशी होणार, असा प्रश्न होता.
मंत्री विखे व थोरात यांनी काल सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर सभापती प्रा. शिंदे, मंत्री विखे व थोरात यांनी तालुकानिहाय नेते व इच्छुकांबरोबर चर्चा केली. त्यावेळी सोसायटी मतदारसंघ किंवा राखीव सात जागा यापैकी एक जागेवर संधी देण्यात येईल. त्या दृष्टीने तालुकास्तरीय नेते व इच्छुकांनी चर्चा करून सांगा. यावेळी काही तालुक्याच्या नेत्यांनी उमेदवार निश्चितीचे अधिकार मंत्री विखे व थोरात यांना दिले. एकंदरीत बँकेच्या निवडणुकीसाठी नेते एकत्र आल्याचे चित्र दिसत असले, तरी बिनविरोधचा तिढा स्थानिक पातळीवर सोडवावा लागणार आहे.
बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याबाबत सर्वच सकारात्मक आहेत. सुरवातीला समन्वय नसल्याने व मतभेद असल्याने काही अडचणी उभ्या राहिल्या होत्या. मात्र आता मतभेद दूर झाल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
राजकीय व्यासपीठावर एकमेकांच्या विरोधात असलेले नेते आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने सर्व नेत्यांनी सकात्मक प्रतिसाद दिला. आजवर बँकेच्या निवडणुकीत नेते एकत्रित उमेदवार निश्चित करीत होते. मात्र, यावेळी निवडणुकीत आव्हान उभे राहिल्याने सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित आणण्याशिवाय पर्याय राहिला नाही. म्हणून पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावर विरोधक असलेले बँकेच्या निवडणुकीनिमित्त एकत्र आल्याचे चित्र होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.