Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी पाथर्डी तालुक्यातील केळवंडी सेवा सोसायटीच्या ठरावावरून निर्माण झालेला वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला.
मात्र, या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने सेवा सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले कडूचंद शेटे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
कडूचंद शेटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांचे समर्थक मानले जातात. या प्रकरणावरून शेटे आणि भाजप (BJP) आमदार मोनिका राजळे यांच्या समर्थकांमध्ये न्यायालयीन संघर्ष झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शेटे यांनी राजळे समर्थकांवर टीका करत, 'सत्याचा विजय झाला,' अशी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सेवा सोसायट्यांचे ठराव जमा करण्याची प्रक्रिया सुरू असताना केळवंडी सेवा सोसायटीची सभा गणपूर्तीअभावी झाली नसल्याचा अहवाल सोसायटीचे सचिव दादासाहेब कंठाळी यांनी सहायक निबंधक कार्यालयाला दिला होता.
या अहवालाला कडूचंद शेटे यांनी आक्षेप घेतला. त्यांनी सहायक निबंधक कार्यालयासह जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि सहकार विभागाच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या. मात्र, कंठाळी यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे संबंधित स्तरावरून कळवण्यात आल्यानंतर शेटे यांनी न्यायालयाचा (Court) मार्ग स्वीकारला.
शेटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने केळवंडी सेवा सोसायटीची बैठक पुन्हा घेऊन ठराव पारित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर झालेल्या बैठकीत कडूचंद शेटे यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाला आमदार मोनिका राजळे समर्थक मयूर सुभाष बर्डे आणि बाळासाहेब अकोलकर यांनी आक्षेप घेतला. त्यांनी नाशिक येथील उपविभागीय सहनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. मात्र, सहनिबंधकांनी शेटे यांच्या बाजूने निर्णय दिला.
यानंतर खंडपीठाने शेटे यांच्या बाजूने दिलेल्या निर्णयाला सीताराम खोजे आणि काकासाहेब खोजे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. या निर्णयामुळे केळवंडी सेवा सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी करण्याच्या शेटे यांच्या मार्गातील न्यायालयीन अडथळा दूर झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कडूचंद शेटे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही परिस्थितीत माझ्या नावाचा ठराव होऊ नये, यासाठी आमदार राजळे यांनी माझ्याविरोधात सर्व पातळीवर भूमिका घेतली. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असल्याने मी न्यायालयात धाव घेतली. सत्याचा विजय झाला, असेही शेटे यांनी म्हटले.
आपल्याविरोधात न्यायालयीन लढाईसाठी आठ वकिलांची फौज उभी करण्यात आल्याचा दावा शेटे यांनी केला. 'त्याऐवजी माझ्याशी चर्चा केली असती, तरी चर्चेतूनही मार्ग निघाला असता. लोकशाहीच्या राज्यात मक्तेदारी चालत नाही,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी करण्याबाबतही शेटे यांनी भूमिका स्पष्ट केली. 'माझे नेते प्रताप ढाकणे यांनी आदेश दिल्यास जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करू,' असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीतील सेवा सोसायटी मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.