Ahilyanagar Bank Election Result 2026 : दुष्काळी स्थिती असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू मानल्या जाणार्या अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व काँग्रेस माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहमती एक्सप्रेसने बाजी मारली व वर्चस्व राखले. जाहीर झालेल्या 21 जागांपैकी विखे पाटील-थोरात गटाने 17 जागा मिळवल्या.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या गटाने समर्थकांच्या दोन जागा तर खासदार नीलेश लंके यांनी स्वतःची जागा जिंकून बँकेत शिरकाव केला. बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या कन्या संजीवनी शिंदे-गायकर यांनी स्वतंत्रपणे लढत विजय मिळवताना अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर मात केली. अर्थात त्या स्वतंत्र लढल्या असल्या तरी थोरात समर्थक म्हणूनच ओळखल्या जातात. बँकेच्या संचालक मंडळात आता एक खासदार व चार आमदार आले आहेत.
21 जागांपैकी विजयी संचालकांमध्ये थोरात गटाचे सर्वाधिक 12 व विखे पाटील गटाचे 5, असे 17जण असल्याने त्यांचे वर्चस्व झाले असले, तरी यंदाच्या निवडणुकीत सभापती प्रा. शिंदे यांचा दोन समर्थकांद्वारे व खासदार लंके (Nilesh Lanke) यांचा स्वतःच्या रुपाने शिरकाव झाल्याने विरोधकांचा हा अंकुश कितपत प्रभावी राहतो, याची उत्सुकता आहे. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या चिरंजीवाला पराभव पत्कारावा लागला. दरम्यान, थोरात गटाचे सर्वाधिक संचालक असल्याने त्यांच्या गटाचाच अध्यक्ष होणार आहे. तो आमदार मोनिका राजळे असतील की अन्य कोणी, याचे कुतूहल आहे.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे (DCC Bank) 3837 सभासद प्रतिनिधी मतदार होते. त्यापैकी 3809 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागा आहेत. दुष्काळी स्थितीमुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले होते. त्यास विखे पाटील-थोरात यांनी प्रतिसाद दिला. प्रा. शिंदेही यात आधी सहभागी झाले. त्यांच्यामुळे खासदार लंकेही यात आले. मात्र, ऐनवेळी बिनसले.
प्रा. शिंदेंनी विश्वासात घेतले नसल्याचा दावा करीत पालकमंत्री विखे पाटील व थोरातांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तर खासदार लंके यांना अपेक्षेप्रमाणे दूर ठेवले गेले होते. परिणामी, विखे पाटील-थोरातांचे सहकार विकास पॅनेल, खासदार लंके व माजी खासदार सदाशिव लोखंडेंचे सहकार परिवर्तन पॅनेल व प्रा. शिंदे यांचे स्वतंत्र चार उमेदवारांचे पॅनेल रिंगणात होते.
विखे पाटील-थोरात सहमती एक्सप्रेसमध्ये सोसायटी मतदार संघात 10 जागा बिनविरोध झाल्या व चार जागांवर लढती होत आहेत. बिगरशेती मतदार संघ जागा बिनविरोध झाली आहे. महिला राखीवच्या दोन तसेच, शेती पूरक संस्था, अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त व ओबीसी या मतदार संघात चुरस रंगली बिनविरोध झालेल्या 11जणांपैकी थोरात गटाचे 6, विखे पाटील गटाचे 4 व प्रा. शिंदे यांच्या गटाचा 1 उमेदवार होते. निवडणूक मतदान झालेल्या 10 जागांपैकी थोरात-विखे पाटील गटाने 7 तर, प्रा. शिंदे गट, लंके-लोखंडे गट व स्वतंत्र एक जण विजयी झाले.
सोसायटी मतदार संघ ः जामखेड - सचिन घुमरे (प्रा. शिंदे गट), अहिल्यानगर तालुका - आमदार अक्षय कर्डिले (विखे गट), कोपरगाव- बिपीन कोल्हे (थोरात गट), नेवासा- माजी मंत्री शंकरराव गडाख (थोरात गट), पाथर्डी- भाजप आमदार मोनिकाताई राजळे (थोरात गट), राहाता - भाजप माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (विखे पाटील गट), संगमनेर - रणजितसिंह देशमुख (थोरात गट), शेवगाव- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले (थोरात गट), श्रीरामपूर- नगराध्यक्ष करण ससाणे (थोरात गट) व श्रीगोंदे- दत्ता पानसरे (विखे पाटील गट). बिगर शेती संस्था मतदार संघ ः सचिन जगताप (विखे पाटील गट).
सोसायटी मतदार संघ ः अकोले - आमदार डॉ. किरण लहामटे (36 मते) व संजीवनी शिंदे-गायकर (49 मते). आमदार लहामटे 13 मतांनी पराभूत. संजीवनी शिंदे अपक्ष उमेदवार, पण विखे पाटील-थोरात समर्थक आहेत. कर्जत- तुषार अंबादास पिसाळ (20मते) व ज्योती प्रकाश शिंदे (54 मते) (विजयी झालेल्या ज्योती शिंदे प्रा. शिंदे गटाच्या उमेदवार आहेत). पारनेर- खासदार निलेश लंके (64 मते) व राहुल शिंदे (40 मते) (विजयी खासदार लंके यांचा सहकार परिवर्तन पॅनल होता). राहुरी- भाजप आमदार प्राजक्त तनपुरे (89 मते) व भाजप सत्यजित कदम (18 मते) (विजयी आमदार तनपुरे थोरात-विखे पाटील गटाचे असले तरी, ते थोरात समर्थक आहेत). शेतीपूरक मतदार संघ- राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (750 मते) व सुधीर म्हस्के (123 मते) (विजयी आमदार काळे विखे पाटील-थोरात गटाचे समर्थक आहेत.) या गटात 8 मते बाद झाली आहेत.
महिला राखीव (दोन जागा) मतदार संघ- अनुराधा नागवडे (2625मते) व संगीता वाघ (2246मते) (दोन्ही थोरात गटाच्या समर्थक आहेत), अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ- माजी आमदार वैभव पिचड (2687 मते) (विखे पाटील गटाचे समर्थक आहेत), इतर मागासर्व-ओबीसी मतदार संघ - कारभारी जावळे (2784 मते) विजयी झाले असून, ते थोरात गटाचे आहेत. भटके विमुक्त मतदार संघात गणपतराव सांगळे (2461 मते)विजयी झाले असून, ते थोरात गटाचे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.