Nilesh Lanke  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar District Bank Election : ‘तुम्ही कितीही अंत पाहा...’; नीलेश लंके यांचा विरोधकांना थेट इशारा, जिल्हा बँकेवरून अहिल्यानगरात संघर्षाची नांदी?

Nilesh Lanke warns opponents ahead of Ahilyanagar District Bank election : पारनेरमध्ये बैठका- पत्रकार परिषदांवरून लंके आक्रमक; ‘बाह्यशक्तींना रोखले पाहिजे’ म्हणत स्थानिक राजकारणावरही स्पष्ट भूमिका

Pradeep Pendhare

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरमधील जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी आपल्या पारनेर मतदारसंघात प्रथमच थेट भाष्य केले आहे.

पारनेर तालुक्याकडे लक्ष नसल्याची टीका करणाऱ्यांना उत्तर देताना लंके यांनी जिल्हा बँकेच्या ठरावाच्या वेळी आपली भूमिका स्पष्ट झाल्याचे सांगितले. तसेच निवडणुकीत कोणतीही बाह्यशक्ती अथवा आंतरशक्ती समोर आली, तरी आपण पुरून उरणार असल्याचा सूचक इशारा खासदार लंकेंनी खंडेरायाच्या चरणी बसून दिला.

जिल्हा बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीत कोणी कितीही प्रयत्न केले, तरी आपण मागे हटणार नाही, असे सांगत खासदार लंके यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तुम्ही कितीही अंत पाहण्याचा प्रयत्न करा; मात्र नीलेश लंके तुम्हाला पुरून उरणार आहे, असे ते म्हणाले. शिक्षण संस्था, कारखाने किंवा मोठे समर्थक असले तरी राजकीय संघर्षातून माघार घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पारनेर तालुक्यात विरोधकांकडून वारंवार आढावा बैठका आणि पत्रकार परिषदा घेतल्या जात असल्याचा दावा करत खासदार लंके (Nilesh Lanke) यांनी त्यावरही टीका केली. माझ्या तालुक्यात येऊन बैठका घ्या, पत्रकार परिषदा घ्या; मात्र त्याने काही फरक पडत नाही, असे ते म्हणाले. राजकीय विरोधासाठी महिलांना पुढे केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच एआयच्या माध्यमातून फोटो तयार करून राजकीय वातावरण निर्माण केले जात असल्याचा दावा करत, “तुमच्या विरोधात माझी कुठेही दंड थोपटण्याची तयारी आहे,” असे लंके यांनी म्हटले.

विकासकामांत अडथळे आणण्याचा आरोप

तालुक्यातील काही व्यक्तींना पुढे करून विकासकामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही खासदार लंके यांनी केला. पारनेर आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकारण चुकीच्या पद्धतीने दूषित करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये,” अशी आठवणही लंके यांनी विरोधकांना करून दिली.

बाह्यशक्तींना रोखले पाहिजे

पारनेर हा पुरोगामी विचारांचा तालुका असल्याचे सांगत बाहेरून येणाऱ्या राजकीय शक्तींना रोखण्याची गरज असल्याचे लंके म्हणाले. तालुक्यातील राजकारण स्थानिक जनतेच्या प्रश्नांभोवती आणि विकासाच्या मुद्द्यांभोवतीच झाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

निवडणुकीच्या हालचालींना वेग

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला आहे. मतदानासाठी ठराव झाले असून मतदारांची प्रारूप यादीही जाहीर झाली आहे. काही दिवसांत अंतिम मतदार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. दहा वर्षे संचालकांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. या मुद्द्यावर सहकार विभागाकडून लवकरच तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राम शिंदे प्रचंड सक्रिय

दरम्यान, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, भाजपचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार विवेक कोल्हे, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह जिल्ह्यातील विद्यमान व माजी आमदार तसेच खासदार सक्रिय झाले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रा. राम शिंदे यांनी सत्ताधारी आणि विरोधी गटांतील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर नीलेश लंके यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधकांना “पुरून उरणार” असल्याचा इशारा दिल्याने अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT