Ahilyanagar drug trafficking : अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या ड्रग्सच्या घटनांबाबत महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा आज उपस्थित करण्यात आला.
श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडत असल्याचा उल्लेख करत सरकार यासंदर्भात कोणती ठोस कार्यवाही करत आहे, असा थेट सवाल केला. आमदार ओगले यांच्या थेट प्रश्नामुळे विधिमंडळात अहिल्यानगरमधील ड्रग्सचा मुद्दा चांगलाच तापला.
काँग्रेस (Congress) आमदार ओगले यांनी श्रीरामपूर इथं तब्बल 14 कोटी रुपयांचे ड्रग्स सापडल्याची माहिती दिली. कुरिअरच्या माध्यमातून इंजेक्शनसह विविध प्रकारचे ड्रग्स मतदारसंघात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
विशेष म्हणजे, जप्त केलेल्या ड्रग्सच्या (Drugs) चोरीत पोलिसच अडकले असल्याचे नमूद करताना त्यांनी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी मुख्यालयात जप्त करून ठेवलेले ड्रग्स काढून विकत असल्याच्या प्रकाराकडे लक्ष वेधले. याप्रकरणी एका पोलिसावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून, संबंधित पोलिसाने चोरीचे सुमारे अडीच कोटी रुपयांचे ड्रग्स विकल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र हे प्रकरण केवळ तेवढ्यापुरते मर्यादित नसून, यामागे मोठी साखळी कार्यरत असण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
आमदार ओगले यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कुरिअर सेवांवर सरकारी यंत्रणांचे बारकाईने लक्ष आहे. कुरिअर सेवा केंद्रांवर वेळोवेळी पथके पाहणी करत असून, तपासणी न करता कुरिअर स्वीकारल्यास व त्यात ड्रग आढळल्यास संबंधित कुरिअर सेवा पुरवणाऱ्यांनाही दोषी धरले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
अलीकडच्या काळात विविध क्लृप्त्या वापरून ड्रग्सची तस्करी केली जात आहे. इन्स्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स मार्केटप्लेसप्रमाणे वापरून ड्रग्सचे व्यवहार केले जात आहेत, याकडे सरकारचे लक्ष आहे. प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी सांगितले की, सुमारे 1600 कोटी रुपयांचे ड्रग्स पकडले जाण्याचे कारण म्हणजे दुर्दैवाने केमिकल ड्रग्स तयार करण्यासाठी मोठी यंत्रणा किंवा फॅक्टरी लागत नाही. अतिशय लहान जागेतही अत्यंत घातक ड्रग्स तयार करता येतात. त्यामुळे ड्रग्स तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांवर आणि केमिकल्सच्या लायसन्सवर कोणाचा अधिकार आहे, याची सखोल तपासणी सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारची भूमिका कडक कारवाईची असून, केवळ आरोपींवरच नव्हे तर या गैरकृत्यांच्या मागे कोणाकोणाचा हात आहे, याचा सखोल तपास यंत्रणांमार्फत केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस देखील ड्रग्स प्रकरणात दोषी सापडल्यास त्यांना तात्काळ बडतर्फ केले जाते, असे सांगताना मुख्यमंत्री यांनी यापूर्वी उत्तर प्रदेशमधून आरोपी पकडण्यात आल्याचे, तसेच मुंबई पोलिसांनी परदेशातून एक मोठे ड्रग रॅकेट चालवणाऱ्याला अटक करून देशात आणल्याचे उदाहरण दिले.
ड्रग्सचा प्रश्न हा केवळ राज्यापुरता मर्यादित नसून, राज्य सरकार आणि संपूर्ण देशासमोरील मोठे आव्हान आहे. मात्र, युवा पिढीच्या सुरक्षित भवितव्यासाठी ड्रग्सचा विळखा नक्कीच दूर केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार ओगले यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सभागृहात दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.