Ahilyanagar defence hub Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar defence hub : तोफगोळे, ड्रोन, RDX ते इनोव्हेशन सेंटर; अहिल्यानगर बनतंय देशाचं नवं ‘डिफेन्स पॉवरहाऊस’

Defence Minister Rajnath Singh inaugurate India largest private-sector 155mm artillery shell manufacturing facility Shirdi on May 23 : अहिल्यानगरमधील शिर्डीच्या सावळीविहीरमध्ये 155 मिमी तोफगोळा उत्पादन प्रकल्प सज्ज होत असून 5 हजार युवकांना रोजगाराची संधी देणाऱ्या या प्रकल्पाचे उद्घाटन संरक्षणमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra defence corridor : अहिल्यानगर जिल्हा आता देशाच्या संरक्षण नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर देशातील नव्या संरक्षण उत्पादन हबच्या दिशेने झेप घेणार असल्याची माहिती भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

शिर्डीतील सावळीविहीर इथल्या या प्रकल्पात 155 मिमी क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन होणार असून, प्रतिवर्षी तब्बल पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता कारखान्यात विकसित करण्यात आली आहे. खासगी क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठ्या तोफगोळा उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प मानला जात आहे. विशेष म्हणजे संपूर्ण उत्पादन प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि कच्चा माल पूर्णपणे स्वदेशी आहे. अवघ्या एका वर्षात उभारण्यात आलेला हा प्रकल्प पंतप्रधान नंरेद्र मोदी (Narendra Modi) यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ मोहिमेला मोठे बळ देणारा ठरणार आहे.

1 हजार कोटींची गुंतवणूक

शिर्डी (Shirdi) औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर संरक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्प विकसित होत आहेत. यामध्ये रॉकेट लाँचर, लाँग-रेंज रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन प्रणाली तसेच अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक चाचणी सुविधा उभारल्या जात आहेत. या प्रकल्पांसाठी जवळपास 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, त्यापैकी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्ण झाली आहे. या माध्यमातून सुमारे 2 हजार नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.

बेलवंडीत दारूगोळा संकुल

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी इथं राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुमारे 600 एकर जागेवर भव्य दारूगोळा निर्मिती संकुल उभारण्यात येत आहे. टीएनटी, आरडीएक्स आणि एचएमएक्ससारख्या स्फोटकांचे उत्पादन करणारे कारखाने उभारले जाणार असून, त्यासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक प्रस्तावित आहे. दरवर्षी 20 हजार टन टीएनटी उत्पादन क्षमता इथं निर्माण होणार असून, सरकारी आणि खासगी क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठी क्षमता म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.

5 हजार युवकांना रोजगार

शिर्डीत तयार होणाऱ्या तोफगोळ्यांमध्ये स्फोटके भरण्याचे महत्त्वाचे काम अहिल्यानगरमधील प्रस्तावित कारखान्यात होणार आहे. सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल 4 ते 5 हजार युवकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले. यामुळे जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनाही मोठी संधी निर्माण होणार आहे.

संरक्षण क्षेत्र आणखी मजबूत

रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के.के. रेंजेस आणि मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे अहिल्यानगरला आधीपासून संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक ओळख आहे. नव्या संरक्षण प्रकल्पांमुळे ही ओळख आणखी मजबूत होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. शिर्डी हे धार्मिक स्थळ असल्याने प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी प्रकल्प विशेष रासायनिक क्षेत्रात उभारण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

इनोव्हेशन सेंटर

स्थानिक युवकांना संरक्षण उद्योगांसाठी कौशल्यपूर्ण बनविण्याच्या उद्देशाने रतन टाटा ट्रस्टच्या सहकार्याने औद्योगिक वसाहतीत विशेष इनोव्हेशन सेंटर उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, एमआयडीसीकडूनही 50 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. राहाता येथील शासकीय आयटीआयचे स्थलांतर एमआयडीसी परिसरात करण्यात आले असून, भविष्यातील विस्तारासाठी सुपे परिसरात संरक्षण विभागासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रियाही प्राथमिक स्तरावर सुरू आहे.

संरक्षण प्रदर्शन

या ऐतिहासिक उद्घाटनानिमित्त 23 आणि 24 मे रोजी विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या तसेच 100 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. संरक्षण क्षेत्रातील रोजगार, उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या संधी जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील युवकांसाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT