Ahilyanagar Maliwada Gate : अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक वारसा सांगणारी माळीवाडा वेस पाडण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनाला हाताशी धरून, वातावरण निर्मिती केली जात असतानाच, एकनाथ शिंदे शिवसेनेनं ही वेस संवर्धनासाठी न्यायालयीन आव्हान उभं केलं आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे नगरसेवक महापालिकेतील गटनेता दत्तात्रय कावरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहिता याचिका दाखल करत महापालिका प्रशासनाला आव्हान दिलं आहे.
नगरसेवक दत्तात्रय कावरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पुरातत्त्व विभाग, पोलिस अधीक्षक आणि महापौर तसेच नगरसेवक यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे. यामुळे अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून चांगलेच राजकीय रणकंदन पेटणार आहे.
अहिल्यानगर शहरातील माळीवाडा वेस ही सुमारे चारशे वर्षांची ऐतिहासिक वास्तू असून तिचे जतन करणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना, उलट ती पाडण्याचा निर्णय घेत येताना दिसतो आहे. यातून अहिल्यानगर शहरातील जनतेत संताप आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांन पूर्वी प्रशासनाने ही वेस हटवण्यासाठी हरकती मागविल्या होत्या. त्यावेळी तीव्र विरोध झाला होता.
सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी, याविरोधात आवाज उठवला होता. अहिल्यानगर शहरातील इतिहास प्रेमीसह स्थानिक नागरिकांनी वेशीकडे धाव घेत संवर्धनाची मागणी केली होती. यातून तयार झालेल्या दबावातून प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला. आता महापालिकेत लोकप्रतिनिधी विराजमान झाले आहेत.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळीवाडा वेस पाडूच, अशी भूमिका सभागृहात, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संपत बारस्कर आणि नगरसेवकांनी घेतली होती.
सत्ताधाऱ्यांच्या या मुद्दाला एकनाथ शिंदे शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सुरेखा कदम, मंगल लोखंडे, दत्ता कावरे या नगरसेवकांनी कडाडून विरोध दर्शवला, तर सत्ताधाऱ्यांनी ‘विकास’ या नावाखाली इथं महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचा मुद्दा पुढे करत वेश पाडण्याची भूमिका घेतली, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला.
परंतु सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे प्रशासनात ही वेस पाडायचीच, अशी गेल्या काही दिवसांपासून कुजबुज सुरू आहे. यातून महापालिका प्रशासनावर दबाव वाढवला जात आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय पुन्हा मागे घेत, पुन्हा विषय पुढे आणला जात आहे. यातून सत्ताधाऱ्यांच्या हालचालींअगोदर विरोधक सावध झालेत.
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नगरसेवक गटनेता दत्तात्रय कावरे यांनी सावध होत, याचिकेसोबत माळीवाडा वेस ऐतिहासिक असल्याचे पुरातत्त्व विभागाचे पत्र, चारशे वर्षांचा इतिहास, तसेच यापूर्वी नागरिकांनी दाखल केलेल्या सुमारे 2 हजार हरकतींचा तपशीलही न्यायालयासमोर सादर करत याचिका दाखल केली आहे.
या प्रकरणात ॲड. नारायण नरवडे हे बाजू मांडत असून आता न्यायालय काय निर्णय देते, याकडे संपूर्ण अहिल्यानगर शहराचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी यांनी जोपर्यंत पुरातत्त्व खात्याचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत सर्व विशेषतः ठेवावे, असे पत्र दिले होते, तर दुसरीकडे याचिका दाखल करताना दत्तात्रय कावरे यांनी दिल्लीच्या पुरातत्व विभागाचे काही दाखले सुद्धा, समोर आणले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.