Ahilyanagar marriage fraud : अहिल्यानगर जिल्ह्यात विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे.
मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने एका तरुणाला जाळ्यात ओढून त्याला घरात डांबून ठेवत तब्बल 2 लाख 30 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन महिलांना राहाता पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती येथील 30 वर्षीय शेतकरी (Farmer) विवाहासाठी मुलगी शोधत होता. याच दरम्यान त्याचा संपर्क पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नन्हे गावातील रेश्मा केशव काटे हिच्याशी झाला. तिने साकुरी शिवारातील मंगल अंकुश पठारे हिच्याकडे योग्य मुलगी असल्याचे सांगत तरुणाचा विश्वास जिंकला.
सुरुवातीला लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली आरोपींनी संबंधित तरुणाकडून ऑनलाइन पद्धतीने 12 हजार 500 रुपये उकळले. त्यानंतर 19 जून रोजी फिर्यादी आणि त्याच्या नातेवाईकांना राहाता (Rahata) तालुक्यातील साकुरी शिवारातील गोदावरी वसाहतीत बोलावण्यात आले. तेथे सुगंधा कैलास गायकवाड हिला वधू म्हणून दाखवण्यात आले.
दरम्यान, तरुणाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कोर्ट मॅरेज करण्याचा आग्रह धरला. मात्र याच वेळी आरोपी महिलांनी घरातच लग्न लावून देण्याचा दबाव टाकत अचानक 2 लाख 30 हजार रुपयांची मागणी केली. संशय निर्माण झाल्यानंतर काही नातेवाईक बाहेर पडताच आरोपींनी तरुण आणि त्याच्या मित्राला घरातच कोंडून ठेवत कुटुंबीयांकडे पैशांसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.
घटनेची माहिती मिळताच राहाता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांची सुटका केली. या प्रकरणी रेश्मा काटे, मंगल पठारे आणि सुगंधा गायकवाड या तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपी मंगल पठारे हिच्याविरोधात यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचा इशारा देत अहिल्यानगर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुलगा अथवा मुलगी पाहताना संबंधित कुटुंब, मध्यस्थ आणि व्यवहारांची पूर्ण पडताळणी करावी. मोठ्या रकमेची मागणी, कोर्ट मॅरेजला विरोध किंवा घाईघाईने घरातच लग्न करण्याचा दबाव अशा गोष्टींकडे गंभीरपणे पाहावे, असे पोलिसांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.