Ram Shinde  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde : भाजपमध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध शब्द दिलेले’ संघर्ष? राम शिंदेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

BJP internal lobbying intensifies Ahilyanagar MLC election Ram Shinde pushes loyal workers while names like Sujay Vikhe Patil and Prajakt Tanpure dominate political discussions : अहिल्यानगरची जागा भाजपकडेच राहणार असल्याचा दावा करताना, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ही निष्ठावंतांना संधी मिळावी, असे मत व्यक्त केल्याने उमेदवारीवरून पक्षात नवा ट्विस्ट आला आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar MLC Election : अहिल्यानगर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही जागा भाजपकडेच राहील, असा विश्वास विधान परिषदेचे सदस्य प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला असला, तरी उमेदवारी कोणाला मिळणार यावरून पक्षांतर्गत चर्चांना चांगलाच उधाण आले आहे.

विशेष म्हणजे “निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी मिळावी,” असे स्पष्ट मत व्यक्त करत राम शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे इच्छुकांबाबत महत्त्वाचा राजकीय संदेश दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जामखेड तालुक्यातील चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात माहिती देण्यासाठी भाजपचे (BJP) विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अशोक खेडकर आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेला सुरवात होण्यापूर्वी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी राम शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कदम यांनी आपण विधान परिषदेसाठी (MLC Election) इच्छुक असल्याचे स्पष्ट करत मतदारांशी संपर्क आणि गाठीभेटी सुरू केल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारीसाठी हालचाली तीव्र झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

अहिल्यानगरच्या जागेसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाव देखील चर्चेत असल्याचे विचारले असता, राम शिंदे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. सुजय विखे पाटील यांनी यापूर्वीच मागील दाराने प्रवेश करणार नसल्याचे सांगितले आहे, असे म्हणत त्यांनी विषयाला वेगळे वळण दिले.

दरम्यान, सत्यजित कदम, भानुदास बेरड आणि वसंत लोढा हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते इच्छुक असल्याचे सांगत राम शिंदे यांनी पक्षाने निष्ठावंतांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा उघडपणे व्यक्त केली. त्यामुळे भाजपमध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध शब्द दिलेले चेहरे’ असा अंतर्गत संघर्ष रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर बोलताना राम शिंदे म्हणाले की, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देत मदत केली होती. मात्र त्यांनी अद्याप भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यांच्या आणि फडणवीस यांच्यात काय ठरले आहे, हे योग्य वेळी समोर येईल. या विधानामुळे तनपुरे यांच्याबाबतही भाजपमध्ये काही राजकीय समीकरणे सुरू असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

अंतिम निर्णय फडणवीसांचाच

राम शिंदे यांनी स्पष्ट केले की, विधान परिषदेच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्तरावर होणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील इच्छुकांची लॉबिंग आणि पक्षातील अंतर्गत ताकद आता निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.

भाजपकडून निष्ठावंत की, शब्दपूर्तीला प्राधान्य

अहिल्यानगरची ही जागा यापूर्वी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र सध्याच्या राजकीय समीकरणांमुळे भाजपचे संख्याबळ वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही जागा भाजपकडे कायम राहणार का आणि उमेदवारी निष्ठावंतांना मिळणार की राजकीय ‘शब्दपूर्ती’ला प्राधान्य दिले जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून शेवटच्या क्षणी मोठे धक्कातंत्र

विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि जिल्हा बँक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद उमेदवारीचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे भाजपकडून शेवटच्या क्षणी मोठे धक्कातंत्र वापरले जाण्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT