Ahilyanagar Election Controversy : अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे.
लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार असला, तरी निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजावर आणि काही राजकीय घडामोडींवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
किरण काळे यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देताना निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर शंका व्यक्त केली. अर्ज माघारी घेण्याची अधिकृत मुदत दुपारी तीन वाजता संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी (Collector Office) तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात हालचाली सुरू राहिल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सामान्य नागरिक एखाद्या सरकारी कार्यालयात काही मिनिटे उशिरा पोहोचला तरी त्याला प्रवेश दिला जात नाही. मतदानाची (Voter) वेळ संपल्यानंतर मतदारालाही मतदान केंद्रात संधी मिळत नाही. मग अर्ज माघारीची वेळ संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत निवडणूक कार्यालय सुरू ठेवण्याची गरज काय होती? असा सवाल किरण काळे यांनी उपस्थित केला.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारी अर्जावर AIMIMचे नगरसेवक शहबाज अहमद सय्यद यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केल्याचा मुद्दाही काळे यांनी उपस्थित केला. नाव न घेता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या नेत्यांच्या राजकारणात अशा प्रकारचे विरोधाभास दिसत आहेत. एका बाजूला एखाद्या समाजाविरोधात आक्रमक भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला राजकीय सोयीसाठी त्यांच्याशी हातमिळवणी करायची, ही भूमिका दोन्ही समाजांशी अन्याय करणारी आहे.
काळे यांनी AIMIMवरही थेट टीका करत अहिल्यानगर शहरातील AIMIM ही राष्ट्रवादी काँग्रेसची "बी-टीम" असल्याचा आरोप केला. मुस्लिम समाजाच्या मतांवर निवडून आलेले प्रतिनिधी जातीयवादी राजकारणाला मदत करत असल्याचा दावा करत त्यांनी अशा प्रवृत्तींना मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहन केले. त्याचबरोबर हिंदुत्ववादी तरुणांनीही राजकीय नेत्यांच्या दुटप्पी भूमिकांचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
भविष्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत काळे म्हणाले, AIMIMच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. अहिल्यानगरकरांनी हा राजकीय डाव वेळीच ओळखण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांऐवजी निवडणुका विकासाच्या मुद्द्यांवर लढल्या जाव्यात, अशी भूमिका मांडत काळे यांनी रस्ते, पाणी, वीज, महिला सुरक्षा, रोजगारनिर्मिती, उद्योग-व्यापार आणि युवकांच्या प्रश्नांवर राजकारण केंद्रित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्तेचा वापर जनतेच्या प्रश्नांसाठी व्हावा, राजकीय पोळ्या भाजण्यासाठी नव्हे, असा टोला लगावत त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची अधिकृतपणे उत्तरे देण्याची मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.