Ahilyanagar MLC Election: अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
अशातच पारनेरचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा पारंपरिकरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) राहिलेली असली, तरी भाजपचे वाढते संख्याबळ आणि महायुतीतील अंतर्गत समीकरणांमुळे यंदाची निवडणूक अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. भाजप, अजित पवार राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना यांच्यात या जागेसाठी रस्सीखेच सुरू असतानाच, एकनाथ शिंदे शिवसेनेकडून सुजित झावरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुजित झावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. पारनेरमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन करत झालेल्या या पक्षप्रवेशाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे, शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांशी जवळीक असलेल्या झावरे यांनी नेमक्या राजकीय टायमिंगमध्ये घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला गेला.
त्या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “मी ज्याच्या पाठीशी उभा राहतो, त्याच्या मागे पूर्ण ताकदीने उभा राहतो. तुम्ही इतकी वर्षे उभे केलेले काम वाया जाऊ देणार नाही. योग्य वेळी योग्य घरात आलात,” असे सूचक विधान केले होते. आता विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या त्या वक्तव्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
स्वतः सुजित झावरे यांनीही पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीतील नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. “वसंतदादांनी निष्ठेने पक्षासाठी काम केले, मात्र वेळोवेळी डावलण्यात आले. 2019 मध्ये संधी असतानाही उमेदवारी नाकारण्यात आली आणि बाहेरून आलेल्या उमेदवाराला संधी देण्यात आली,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती. त्याचवेळी “आता शिवसेनेचे धनुष्य वाडी-वस्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला होता.
दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यात शिंदे गटाची संघटनात्मक ताकद अपेक्षेइतकी वाढू शकलेली नाही. महापालिका निवडणुकीत भाजप आणि अजित पवार गटाने शिंदे शिवसेनेला तुलनेने दुय्यम स्थान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. स्थानिक पातळीवर अपेक्षित साथ न मिळाल्याने शिंदे गटाला फारसे यश मिळाले नाही.
नगरपरिषद निवडणुकांमध्येही शेवगाव वगळता बहुतांश ठिकाणी शिंदे शिवसेनेला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शिलेदारासाठी ही जागा खेचून आणण्यात कितपत यशस्वी ठरतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सुजित झावरे यांच्या मुंबईकडे सुरू झालेल्या राजकीय वाटचालीला शिंदे शिवसेनेकडून किती ताकद मिळते आणि महायुतीत अखेर कोणाच्या पारड्यात ही जागा जाते, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.