Ahilyanagar Municipal Corporation Politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar Municipal Corporation Politics : नवी राजकीय समीकरणं? तिजोरी भाजपकडे, राष्ट्रवादीसोबत समांतर सत्तेची चर्चा रंगली

In Ahilyanagar Municipal Corporation, BJP Subhash Londhe was elected to the Standing Committee, while NCP Deepali Barskar and BJP Varsha Sanap were elected unopposed to the Women and Child Welfare Committee : अहिल्यानगर महापालिकेच्या 'स्थायी', महिला व बालकल्याण समितीवरील सभापती आणि उपसभापतींच्या बिनविरोध निवडीवर आजच्या सभेत शिक्कामोर्तब होणार आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महापालिकेतील स्थायी समिती भाजपने आपल्याकडे खेचून घेतली आहे. तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती-उपसभापतीपदावर अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजपने आपसात वाटून घेतलं आहे. महापौरपद राष्ट्रवादी तर, उपमहापौर भाजपकडे आहे.

महापालिकेतील समित्यांच्या वाटपात भाजप-राष्ट्रवादीबरोबर समान सहभागी झाल्याने, विशेष करून तिजोरीच्या म्हणजेच, स्थायी समितीच्या चाव्या भाजपने आपल्या हातात घेऊन, शहरातील राजकारणात भाजप राष्ट्रवादीबरोबर समांतर उभी राहात आहे. आगामी काळात अहिल्यानगर शहरात भाजप मोठ्या राजकीय उलथापालथी करण्याचे हे संकेत आहेत, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे (BJP) सुभाष लोंढे, महिला व बालकल्याण समिती सभापती पदावर अजित पवार राष्ट्रवादीच्या दीपाली बारस्कर व उपसभापती पदावर भाजपच्या वर्षा सानप यांचे एकमेवर अर्ज दाखल झाले होते. यामुळे यांची बिनविरोध निवड होणार असल्याचं स्पष्ट झालं. महापालिकेच्या आजच्या सभेत यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या युतीमध्ये स्थायी समितीचे सभापतीपद भाजपकडे तर, महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद अजित पवार राष्ट्रवादीकडे, असे वाटप झाले आहे.

सुभाष लोंढे हे भाजपमधील विखे (Radhakrishna Vikhepatil) समर्थक म्हणून ओळखले जातात. निवडणुकीपूर्वी काही दिवस अगोदरच, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वीही त्यांची एकत्रित शिवसेनेकडून सभापती म्हणून निवड झाली होती.

महापालिकेवर भाजप-अजित पवार राष्ट्रवादीने युतीने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. महापौर, उपमहापौर, सभापती व उपसभापती पदाच्या निवडी बिनविरोध होत आहेत. महापौर व उपमहापौर यांच्याप्रमाणेच सभापती आणि उपसभापती पदांचा कार्यकाल देखील सव्वा वर्षांचा असण्याची शक्यता आहे.

जगतापांचा बालेकिल्ल्यात भाजप उभी राहतेय

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा, म्हणजेच आमदार संग्राम जगताप यांचा, बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आमदार जगताप यांचे शहर मतदारसंघासह महापालिकेवर वर्चस्व आहे. परंतु विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीनंतर शहरात भाजप, आमदार जगताप यांच्याबरोबर समांतर उभी राहत आहेत.

जगताप हे विखेंच्या 'गुड बुक'मध्ये...

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीनंतर आमदार जगताप यांनी आक्रमक हिंदुत्व स्वीकारलं आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरून, ते राज्यभर आक्रमक आहे. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याबरोबर ते 'गुड बुक'मध्ये आहेत.

भाजप अन् राष्ट्रवादीचं बळ

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप देखील पहिल्यादांच 25 नगरसेवक निवडून आले आहेत. अजित पवार राष्ट्रवादीचे 27 नगरसेवक आहेत. म्हणजेच, दोन्ही बाजूने जवळपास समान नगरसेवक आहेत. त्यामुळे सत्तेत पुढील काळात राष्ट्रवादीबरोबर, म्हणजेच आमदार जगताप यांच्याबरोबर, आगामी काळात भाजप शहरात समांतर उभी राहाताना दिसेल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT