Ahilyanagar Sugar Factory Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप मंत्री राधाकृष्ण विखे अन् काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत, असा आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हा संघर्ष टोकाला पोचला होता. यातून विखे-थोरात या दोन्ही कुटुंबाला पराभवाचे हादरे बसले.
सहकार कारखान्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विखे-थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळणार असे संकेत असतानाच, सहकारमध्ये विखे-थोरात 'सहमती एक्स्प्रेस' जोरात धावली. परिणामी, विखे आणि थोरात यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या सहकारी कारखाने बिनविरोध झाले. यात बिनविरोध होण्यात थोरात यांच्या कारखान्यानं आघाडी घेतली आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संगमनेरमधील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी केली. थोरात यांचा कारखाना बिनविरोध होताच, थोरातंचे कट्टर प्रतिस्पर्धी भाजप (BJP) मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांशी राजकीय 'सेटलमेंट'च्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
बाळासाहेब थोरात (Balasahb Thorat) यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या पराभवात थोरात यांनी अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात किंगमेकरची भूमिका निभावली होती. तेव्हापासून विखे-थोरात यांचा राजकीय संघर्ष शिगेला पोचला होता. सहकार कारखान्यांच्या निवडणुकीत देखील हा संघर्ष कायम राहिल, अशी चिन्हं होती. थोरातांचा पराभव करणारे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर सहकार कारखाना काबीज करण्याचं नियोजन सुरू केलं होतं.
भाजप मंत्री विखे पाटील यांचे आमदार अमोल खताळ हे कट्टर समर्थक समजले जातात. विधानसभा निवडणुकीत मंत्री विखे पाटील यांची संपूर्ण यंत्रणा संगमनेरमध्ये उतरली होती. त्यामुळे खताळ यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. यातच आमदार खताळ यांनीसंगमनेरची निवडणूक लढण्याचं जाहीर केलं. पण ऐनवेळी मंत्री विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे यांनी मोठी घोषणा केली. एका अलिखित कराराची आठवण करून दिली.
सहकाराच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढायचं नाही, असा अलिखित करार आम्ही पाळत आलो आहोत, याची आठवण विखे पिता-पुत्रानं करून दिली. यामुळे सहकार कारखान्याच्या निवडणुकीत विखे-थोरात यांच्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळाला. पण याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचं मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं होते. सहकारमधील हाच तो अलिखित करार विखे-थोरात यांना कुठे राजकीय संघर्ष थांबवायचा हे सांगत आला आहे. त्यामुळे विखे-थोरात यांच्या सहमतीचं राजकारण काही काळ का होईना, या नगर जिल्ह्याला पाहायला मिळेल, असे दिसते.
थोरात यांच्या पराभवानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी 133 अर्ज दाखल झाले होते. शेतकरी विकास मंडळांव्यतिरिक्त आमदार अमोल खताळ व अन्य विरोधकांनीही या निवडणुकीतून माघार घेतली. निवडणूक बिनविरोध होताच, बाळासाहेब थोरात यांनी सर्वांचे आभार मानले आहे.
सोसायटी मतदारसंघ- बाळासाहेब भाऊसाहेब थोरात, साकुर गट- इंद्रजित खेमनर, सतीश वरपे, रामदास धुळगंड, जोर्वे गट इंद्रजित थोरात, डॉ. तुषार दिघे, विलास शिंदे, तळेगाव गट- संपतराव गोडगे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, धांदरफळ गट- पांडुरंग घुले, विजय राहणे, विनोद हासे, अकोले/जवळे गट- गुलाब सयाजी देशमुख, संतोष हासे, अरुण वाकचौरे, अनुसूचित जाती जमाती मतदार संघ- योगेश निवृत्ती भालेराव, महिला राखीव मतदार संघ- लता बाबासाहेब गायकर, सुंदरबाई रावसाहेब डूबे, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघ- नागरे दिलीप श्रीहरी, इतर मागासवर्गीय मतदार संघ- अंकुश बाळासाहेब ताजणे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.