Shanishingnapur temple corruption : अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर इथल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील 500 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. मुंबई धर्मादाय आयुक्तांनी देवस्थान ट्रस्टाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह विश्वस्तांना नोटिसा बजावल्या आहेत.
सायबर शाखा पोलिसांकडून काल ऑनलाईन दर्शन अॅप घोटाळ्याप्रकरणी पंचनामा अन् प्रश्नांची सरबराई केली. यानंतर मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयाने शनिशिंगणापूर इथल्या शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या सर्व अकरा विश्वस्तांना समक्ष नोटीस बजावली. यानुसार शुक्रवारी (ता.18) रोजी मुंबई धर्मदाय कार्यालयात म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्याचे सुचविले आहे.
आमदार विठ्ठल लंघे व आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळात लक्षवेधी मांडून देवस्थानातील ऑनलाईन दर्शन ॲप घोटाळा व नोकर भरतीमधील भ्रष्टाचार मांडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नोकर भरती चौकशीचा सात-बारा उघड करत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या अगोदर फौजदारी दाखल करण्याचे संकेत दिले होते. दुसऱ्या दिवसापासून अहिल्यानगर येथील सायबर शाखा अलर्ट मोडवर आली, तर आज धर्मदाय आयुक्त कार्यालयाने नोटिस बजावली.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या सीमा केणी यांची सही असलेली नोटिस विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर यांच्यासह नऊ विश्वस्तांना देण्यात आली आहे. शुक्रवारी (ता.18) आपल्या वकिलासह सकाळी 11.30 वाजता मुंबई (Mumbai) धर्मादाय कार्यालयात आपले म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहावे, असा उल्लेख त्यात आहे.
डिसेंबर 2025 रोजी विश्वस्त मंडळाची मुदत संपत असताना ऑनलाईन ॲपच्या घोटाळ्याबरोबरच नोकर भरती, भ्रष्टाचार व अन्य बाबींवर चौकशी सुरू झाल्याने विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित नातेवाईकांची चिंता वाढली आहे.
दीड महिन्यापासून शनिशिंगणापूर इथल्या ऑनलाईन दर्शन अॅप घोटाळ्याचा प्रश्न ऐरणीवर असताना व विविध व्यक्ती व संघटनांकडून आरोपांच्या फैरी होत असताना देवस्थानने शांत राहणे पसंत केले होते. चौकशीचा ससेमिरा सुरू होताच देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात सोमवारी (ता.14) घाईगडबडीत ऑनलाईन अॅप विषयी नम्र सूचनेचा फलक लावला आहे.
ऑनलाईन अभिषेक, साडेसाती निवारण पूजा, तेल अभिषेक तसेच ऑनलाईन दर्शन या सर्व बाबी कुठल्याही पुरोहिताशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे अॅप कंपनी मालक व साथीदारांची चौकशी होताना, पुरोहितांचा सहभाग तपासला जाणार असल्याची माहिती आहे.
शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारासोबत तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालानंतर हा भ्रष्टाचार उघड झाला. बनावट अॅपच्या माध्यमातून भक्तांकडून पूजेच्या नावाखाली 1800 रुपये घेतले, यातून लाखो भक्तांची लूट केली. बोगस कर्मचारी भरती दाखवली. तब्बल 2 हजार 447 कर्मचाऱ्यांनी देवस्थानकडून वेतन अदा. प्रत्यक्षात मात्र 250-275 कर्मचारी देवस्थान कार्यरत आहे.
देवस्थानच्या रुग्णालयात 327 कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात तिथं चार वैद्यकीय अधिकारी आणि 9 कर्मचारी आहेत. रुग्णालयाला बाग नसताना तेथे बाग असून तिच्या देखभालीसाठी 80 कर्मचारी दाखवण्यात आले. भक्त निवासात 109 खोल्या असताना, तिथं 200 कर्मचारी कामाला असल्याचे दाखवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिराचे ट्रस्ट बरखास्त करून शिर्डी आणि पंढरपूर देवस्थानच्या धर्तीवर मंदिर विश्वस्त मंडळ तयार करण्यात येणार असल्याचे विधिमंडळात जाहीर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.