Ahilyanagar political strength : विखे, थोरात, कर्डिले, शिंदे, पवार, लंकेंची 'झेडपी' झोप उडवणार!
Ahilyanagar Zilla Parishad politics : अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या गट अन् गण प्रारूपसमोर आले असून, राजकीय आखाड्यात नियोजन सुरू झालं आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात एक गट अन् दोन गण वाढले आहेत. संगमनेरमध्ये सर्वाधिक गट आहेत, तर नगर तालुक्यातील गटांची फेररचना झाल्याने इथं राजकीय ताकद लाववी लागणार आहे.
'झेडपी'चा राजकीय आखाडा रंगल्यास सर्वाधिक भाजप मंत्री राधाकृष्ण विखे, काँग्रेस बाळासाहेब थोरात, भाजपचे सभापती प्रा. राम शिंदे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, खासदार नीलेश लंके आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची सर्वाधिक राजकीय ताकद खर्ची पडणार असल्याचे प्राथमिक दिसते.
'झेडपी' म्हणजे मिनी मंत्रालय. राज्य आणि केंद्र सरकारचा थेट निधी या मिनी मंत्रालयात येतो. आमदारकीकडे जाण्याचे देखील दार म्हणून 'झेडपी'कडे पाहिले जाते. लोकसभेचे देखील नेतृत्व देखील उदयास येऊ शकते. 'झेडपी'च्या निवडणुका म्हणजे, राजकीय करिअरच्या अस्तित्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे निवडणुकीच्या (Election) आखाड्यात तडजोडीपेक्षा सर्वाधिक राजकीय डावपेच खेळले जातात.
अहिल्यानगर 'झेडपी'चा गट अन् गण रचनेचा प्रारूप आराखडा समोर आला आहे. जवळपास निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. तब्बल साडेआठ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासक राज सुरू आहे. त्यामुळे अनेक राजकीय संदर्भ बदलले आहे. भाजप महायुती (Mahayuti) सरकराने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लांबणीवर टाकल्याचा रोष सर्वाधिक आहे.
लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने संविधान बचाव कार्ड चालले, मात्र विधानसभेला महायुतीचे हिंदुत्वाचे आणि लाकडी बहीण योजनेचे कार्ड चालले. परिणामी विधानसभेत महायुतीला पाशवी बहुमत मिळालं. 'स्थानिक'साठी लढाईचे मात्र संदर्भ बदलणार आहेत. सर्वाधिक संघर्ष होणार तो राज्य सरकारकडून मिळत नसलेल्या निधीवरून! अहिल्यानगर जिल्ह्याचा राजकीय विचार केल्यास दोन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे खासदार आहे. विधानसभेत महायुतीचे प्राबल्य दिसते. त्यांचे दहा, तर मविआचे दोन आमदार आहेत.
लोकसभेला जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या व्यूहरचनेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे बळ मिळालं होते. तुलनेत विधानसभेला थोरात-विखेंचा संघर्ष उफाळला. या निवडणुकीत मविआला थोरातांच्या पराभवाचा जोराचा धक्का बसला. थोरातांबरोबर शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे, अमित भांगरे यांना पराभव झाला. राधाकृष्ण विखे यांनी भाजप महायुतीला एकहाती वर्चस्व मिळवून दिलं. या निवडणुकीनंतर थोरात-विखेंचा राजकीय संघर्ष पेटला होता. तो विखे-थोरात सहकारी कारखान्यांच्या निवडणुकीत शमला.
राज्यात महायुतीचं सरकार आहे. हिंदुत्वाचं सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पॅटर्न वेगळा असतो. राज्यात आर्थिक पातळीवर गटांगळ्या खात असलेल्या महायुती सरकारचा हिंदुत्वाचा मुद्दा 'स्थानिक'मध्ये चालणार नाही. तसेच महायुतीमध्ये 'इनकमिंग' होऊन, त्यातून आलेला फुगवटा स्थानिकमध्ये कितपत टिकेल? याचा अंदाज विश्लेषकांना देखील बांधता येईनासा झाला आहे.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेत कर्जत आणि जामखेड तालुक्यांची राजकीय ताकद वाढली आहे. तिथं प्रत्येकी एक गट आणि दोन गण वाढले आहेत. कर्जत-जामखेडमध्ये विधानपरिषदेचे भाजप आमदार तथा सभापती प्रा. राम शिंदे अन् राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र आहे.
अजित पवार यांचं बळ कोणाला?
रोहित पवार जनतेतून आमदार झाले असले, तरी प्रा. राम शिंदे विधानपरिषदेवर जात थेट सभापती पदावर विराजमान झाले आहेत. यातून त्यांची राजकीय ताकद वाढली असून, मतदारसंघातील पवारांचे एक-एक संस्थान खालास करण्यास सुरवात करत, भाजपला मजबूत स्थिती आणलं आहे. आमदार पवार यांच्या ताब्यात असलेल्या कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, खरेदी-विक्री संघ, कर्जत दूध संघ आणि जामखेड बाजार समितीमधील सत्ता काढून घेतली आहे. यामुळे झेडपी निवडणुकीत शिंदे-पवार संघर्ष पाहायला मिळणार आहे. कर्जतमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बळ कोणाला मिळणार याकडे लक्ष असणार आहे.
आमदार खताळ भिडणार
संगमनेरमध्ये सर्वाधिक गट आहेत. इथं नवखे आमदार अमोल खताळ आणि मुरब्बी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात संघर्ष निश्चित आहे. विधानसभेला विखे पिता-पुत्रांनी संगमनेरमध्ये जोर लावल्यानं थोरात यांच्या 40 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावत सत्ता परिवर्तन घडवलं. थोरात कारखान्याला ताब्यात घेण्याती आमदार खताळ यांनी लढाई सुरू केली असतानाच, विखेंनी त्यांना सहकार थोरात यांच्याबरोबर युती दाखवली.
थोरातांची पुन्हा बांधणी
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अमोत खताळ यांना विखे पिता-पुत्रांकडून किती बळ मिळणार, याकडे आता लक्ष असेल. तत्पूर्वी थोरात विधानसभेतील पराभवानंतर मतदारसंघात तळ ठोकून आहे. पराभवाच्या दुसऱ्या दिवसांपासून त्यांनी बैठकांचा जोर धरला असून, तो कायम आहे. त्यामुळे स्थानिकसाठी थोरात अन् विखेंमध्ये सर्वाधिक संघर्ष पाहायला मिळणार आहे.
तनपुरेंचा आत्मविश्वास वाढलाय
राहुरी आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात नगर तालुका येतो. इथं गटांचीही फेररचना झाली आहे. त्यात गावांचीही अदलाबदल झाली दिसते. इथं भाजप आमदार तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि खासदार नीलेश लंके यांच्या संघर्ष पाहायला मिळेल. तनपुरे सहकारी कारखाना निवडणुकीतून ताब्यात घेतल्यानं प्राजक्त तनपुरे यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो. पारनेर विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्याचा काही भाग येतो. खासदार नीलेश लंके यांचं इथं वर्चस्व आहे.
कर्डिलेंना जावयाचं बळ मिळणार
याशिवाय आमदार कर्डिले विरोधक एकीत आहे. त्यामुळे आमदार कर्डिलेंना इथं संघर्ष अटळ आहे. परंतु त्यांचे जावई आमदार संग्राम जगताप त्यांना बळ मिळेल, असे सांगितले जाते. नगर तालुका हा अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाजवळ येतो. आमदार जगताप यांचे बरचं वर्चस्व इथं आहे. त्यामुळे कर्डिलेंना जावयाकडून निश्चित बळ मिळेल, असे विश्लेषकांचं म्हणणं आहे.
राणी लंके झेडपी लढणार का?
खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होत्या. अजित पवार यांचा शिलेदार काशिनाथ दाते यांच्याविरोधात त्यांची लढत झाली. राणी लंके यांचा या निवडणुकीत पराभव झाला. अजितदादांच्या काशिनाथ दाते यांना, अर्थात विखे यांचे बळ मिळालं होते. याचा वचपा लंकेंना 'झेडपी'त घ्यायची तयारीत आहेत. तसं राणी लंके या झेडपी सदस्य राहिल्या आहेत. त्या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असणार का याची देखील उत्सुकता आहे.
सर्वाधिक व सर्वात कमी लोकसंख्या
अंतिम प्रभाग रचना 18 ऑगस्टला जाहीर होणार आहे. त्यासाठी 21 जुलैपर्यंत हरकती दाखल करता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक 57672 लोकसंख्येचा गट राहाता तालुक्यातील, तर सर्वांत कमी 35690 लोकसंख्येचा गट जामखेड तालुक्यातील आहे. गणामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला गण राहाता तालुक्यात 28836, तर सर्वात कमी लोकसंख्या असलेला गण जामखेड तालुक्यातील 17824 आहे.
तालुकानिहाय गट व गणांची संख्या (कंसात गणांची संख्या)
अकोले- 6(12), संगमनेर- 9(18), कोपरगाव- 5(10), राहाता- 5(10), श्रीरामपूर- 4(8), नेवासा- 7(14), शेवगाव- 4(8), पाथर्डी- 5(10), अहिल्यानगर- 6(12), राहुरी- 5(10), पारनेर- 5(10), श्रीगोंदा- 6(13), कर्जत- 6(10) आणि जामखेड- 3(6).
गट-गणाचे निकष
राज्य निवडणूक आयागाने गट आणि गण जाहीर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली होती. त्यानुसार तालुक्यातील लोकसंख्येच्या समप्रमाणात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांची संख्या निश्चित करण्यात आली. भौगोलिक संलग्नता, दळणवळण, नदी आदी निकषानुसार गावांची जोडणी गट आणि गणांत करण्यात आली आहे. ही रचना करताना लोकसंख्या 5 टक्के अधिक किंवा उणे ठेवण्याची तरतूद आहे. तालुक्याच्या उत्तर भागातून प्रारूप प्रभाग रचनेला प्रारंभ केला जात आहे. त्यानंतर पूर्व भाग, पश्चिम आणि सर्वांत शेवटी दक्षिण भागातील गट-गणांची रचना केली आहे.
प्रभाग रचना कार्यक्रम
14 जुलैला प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध होणार.
21 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करणे.
28 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त हरकतींच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करणे.
11 ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय घेणे.
18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर करणे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.