Ahilyanagar Shevgaon news : देशाची प्रगती हे रस्ते सांगतात. चांगले रस्ते हे देशाच्या विकासाच्या धमण्या म्हणून ओळखल्या जातात. यावरून विकास कामांमध्ये रस्त्यांना खूप महत्त्व असते.
राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आपल्या भाषणात, रस्त्यांच्या कामांचा आवर्जुन उल्लेख करतात. रस्त्यावरून दिल्लीपासून ते गल्लीपासून राजकारण तापले. गावाचं राजकारण रस्त्यांभोवतीच फिरते. त्यामुळे राजकारण्यांच्यादृष्टीने रस्ता हा जिव्हाळ्याचा विषय असतो. याच रस्त्याने एका महिला सरपंचाची अडचण केली आहे.
ही घटना 28 जुलैची! पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर चिखलातून जाणाऱ्या शाळकरी मुलांनी महिला सरपंचाच्या चारचाकी वाहनांवर चिखलफेक केली. तसा व्हिडिओ समाज माध्यमावर (Social Media) व्हायरल झाल आहे. नवीन दहिफळ (ता.शेवगाव) कच्चा रस्ता चिखलाने व्यापला होता. मुलांना शाळेत जाताना, हा चिखल तुटवत जावे लागे. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालकांमध्ये रस्त्याविषयी रोष होता. पालकांमध्ये चर्चा होती. गाव पुढाऱ्यांवर खापर फोडले जात होते. या गप्पा विद्यार्थ्यांच्या कानावर पडत होत्या. यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गाव पुढाऱ्यांविषयी संताप वाढत होता. आणि पुढं झालंही तसंच!
विद्यार्थी चिखल तुटवत शाळेची वाट काढत होते. तेवढ्यात त्यांच्यासमोर गावच्या सरपंच (Sarpanch) सविता शिंदे चारचाकी वाहनातून चालल्या होत्या. रस्त्यावरील चिखलामुळे वाहन सावकाश चालवले जात होते. पण रस्त्यावरील भल्यामोठ्या खड्ड्यामुळे वाहन कसं काढावं, या विचारात असलेल्या महिला सरपंचाच्या चालकाने वाहन थांबवलं. वाहनात महिला सरपंच असल्याचे लक्षात आल्यावर मुलांनी संताप सुरू केला.
महिला सरपंच सविता शिंदे यांच्या वाहनाला मुलं आडवी झाली. पुढं मागं न बघता, मुलांनी थेट वाहनावर रस्त्यावरील चिखल हातात, घेत चिखलफेक सुरू केली. महिला सरपंच हुशार, त्यांना मुलांचा रोष लक्षात आला. त्यांनी सयंम बाळगला. मुलांनी सरपंचांना वाहनातून खाली उतरवलं, आम्ही या चिखलातून शाळेत कसं जातो, याकडे लक्ष वेधलं. महिला सरपंचांनी मुलांचा मुद्दा चुकीचा नाही, योग्य असल्यानं शांततेनं घेतलं.
माहितीनुसार, नवीन दहिफळ ते ढोरहिंगणी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. गाव पुनर्वसित होऊन अर्धशतक झालं. मात्र पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. महिला सरपंचांचे पती व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे यांनी या प्रश्नावर आमदार, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र रस्ता मार्गी लावण्यासाठी आश्वासनांशिवाय कोणतेही ठोस कार्यवाही झाली नाही.
काही दिवसांपूर्वी सरपंच सविता शिंदे आणि त्यांचे पती यांनी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. परंतु तेही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सरपंचांचं वाहन अडवून त्यांना जाब विचारला आणि चिखलफेक केली. या घटनेमुळे एका महिला सरपंचाला आणि त्यांच्या पतीला अपूर्ण आश्वासनांना चांगलचं तोंड द्याव लागल्याची चर्चा आहे.
सरपंच सविता शिंदे म्हणाल्या, "मुलांनी वाहन आडवलं. रस्त्यावरील चिखलामुळे त्यांचा संताप होता. रस्ता पूर्ण करण्याचं आश्वासन आहे. मुख्यमंत्र्यांकडे रस्त्या मागितला आहे. पण तो काही पूर्ण झालेला नाही. मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी जायचं आहे. रस्त्याचं काम मार्गी लावण्यासाठी मुलांची देखील मुख्यमंत्र्यांना भेटण्याची तयारी आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.