Pune News, 17 Aug : राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रपवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीमध्ये अनेक आंदोलन मोर्चे त्यांनी काढले. मात्र, या मोर्चाच्या मालिकेची सुरुवात नेमकी कुठून झाली याबाबत खुद्द शरद पवार यांनीच किस्सा सांगितला आहे.
पहिला मोर्चा नेमका कशासाठी काढला? कोणाच्या विरोधात काढला आणि नेमका कुठे काढला? याबाबतचा शालेय जीवनातील रंजक किस्सा शरद पवारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितला. पुण्यातील एस.एम.जोशी सभागृहामध्ये साथी किशोर पवार यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, मी एक गमतीची गोष्ट सांगू इच्छितो मी नववीत शिकत असताना मी प्रवरा नगरच्या महात्मा गांधी विद्यालयात शिकत होतो. आता प्रवरा नगरचा आणि माझा काय संबंध तर माझे वडील बंधू आप्पासाहेब पवार हे त्या ठिकाणी नोकरी करत होते.
त्या वेळेला सातवी-आठवी हे शिकत असताना अभ्यासापेक्षा इतर उद्योगात मी जास्त लक्ष घालतो म्हणून माझ्या आई-वडिलांनी मला प्रवरा नगरला पाठवलं आणि प्रवरा नगरच्या शाळेमध्ये मी एक वर्ष शिकलो. त्या शाळेचे वैशिष्ट्य एकच होता कि, अनेक चळवळीमध्ये त्या शाळेतले विद्यार्थी अग्रभागी असायचे, असं शरद पवार म्हणाले.
गोव्याची चळवळ सुरू झाली एस.एम.जोशी असतील, बॅरिस्टर नाथ पै असतील, किशोर पवार असतील या सगळ्यांनी त्या चळवळीत झोकून दिलं आणि एक मोठा सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. तो सत्याग्रह कुठे तर गोव्याच्या सीमेवर. हिरवे गुरुजी नावाचे जे गृहस्थ होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक सत्याग्रहाची तुकडी होती.
पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि सत्याग्रह केल्यानंतर ह्या तुकडीवर पोर्तुगीजांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये हिरवे गुरुजी मृत्युमुखी पडले. ही बातमी जशी आली तसं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चळवळी उभ्या राहिल्या. हे सांगायचं कारण म्हणजे माझ्या आयुष्यातील पहिला मोर्चा मी प्रवरा नगरला काढल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवार पुढे म्हणाले, आमची शाळा बंद केली आणि शाळा बंद करून पोर्तुगीजांचा निषेध करण्याचा मोर्चा मी काढला. माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही प्रवरा नगरमधून झाली. आम्ही मोर्चा काढला. कारखान्यावर गेलो. कारखान्याच्या लोकांना सांगितलं कारखाना बंद करा. गोव्याचा सत्याग्रह सुरू आहे. लोकांनी हौतात्म्य पत्करलं. म्हणून आपल्याला हे सगळं बंद करायचं.
कारखान्यांच्या संस्थापकांमध्ये अनेक लोक होते अण्णासाहेब शिंदे होते, पद्मसिंह विखे पाटील होते असे अनेक लोक होते. ज्यांनी हा कारखाना उभा केला आणि आम्ही मोर्चा त्यावेळेला काढला आणि कारखाना बंद करा हे सांगायला आलो त्या वेळेला पद्मसिंह विखे पाटील हे आमच्या समोर आले. त्यांनी आम्हाला लोकांना विचारलं, "पोरांनो काय तुमचं म्हणणं आहे?" मी सांगितलं "कारखाना बंद करा.
पोर्तुगीजांचा निषेध करायचा हिरवे गुरुजींची हत्या झालेली आहे." त्यांनी विचारलं, "जर तुम्ही कारखाना बंद केला तर तुमच्या गोव्याचा प्रश्न कसा सुटेल?" आमच्याकडे काही उत्तर नव्हतं आम्ही सांगितलं, "आम्हाला माहित नाही. कारखाना बंद करा." ते म्हणाले, "मी कारखाना कायमचा बंद करतो गोवा घेऊन दाखवा."
आमच्याकडे काही उत्तर नव्हतं. पण माझ्या मनात ही राहिलेली गोष्ट गमतीशीर आहे. त्या काळामध्ये या सबंध गोव्याच्या चळवळीचे नेतृत्व करायचं काम किशोर आणि त्यांचे बाकीचे सहकारी करत होते. महाराष्ट्रमध्ये एक वेगळं वातावरण त्या काळामध्ये झालं अनेक गोष्टी त्यांच्या सांगता येतील असं देखील शरद पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.