Ahilyanagar Shirdi Sai Mandir news : भारत-पाकिस्तान युद्ध तणावात सुरक्षिततेच्या कारणास्तव शिर्डीतील साई मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद नेण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. याकाळात शिर्डीतील साईमंदिर परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ करत त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभी करण्यात आली होती.
आता युद्धीबंदी झाली असून, या परिस्थितीचा फेर आढावा घेऊन हार, फुलं आणि प्रसादला साई समाधी मंदिरात घालण्यात आलेला प्रतिबंध मागे घ्यावा, अशी मागणी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना कोल्हे यांनी यासंदर्भात पत्र देखील पाठवलं आहे.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, "शिर्डीच्या (Shirdi) साई संस्थानला मध्यंतरी धमकीचा मेल आला होता. मात्र हा मेल चुकून साई संस्थानकडे आला. प्रत्यक्षात तो तामिळनाडूतील एका साई मंदिरासंदर्भात होता. ही वस्तुस्थिती असेल, तर चुकीच्या मेलच्या आधारे हार, फुलं साई मंदिरात नेण्यास प्रतिबंध असावा की नाही, याचा फेर आढावा घेतला जावा".
कोपरगाव, राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो छोट्या शेतकरी (Farmers) फुलांची शेती आहे. त्यात प्रामुख्याने गुलाबाच्या फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावं लागत आहे. गुलाबाच्या बागेचं आयुष्य आठ ते दहा वर्षांचे असते. या बागेची खूप निगा राखावी लागते. तसेच या निर्णयामुळे झेंडू, निशीगंध आणि सब्जाची शेती करणारे कष्टाळू शेतकरी देखील अडचणीत सापडल्याकडे स्नेहलता कोल्हे यांनी लक्ष वेधले.
झेंडूचे भाव पडल्यानंतर पिक काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही. फुलांची शेती नाशवंत उत्पादनाची शेती आहे. साई संस्थानने या छोट्या शेतकऱ्यांपुढे उभ्या राहिलेल्या समस्येबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली.
या निर्णयचा फेर आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधताना, फुलशेती ही प्रामुख्याने कष्टकरी शेतकऱ्यांची शेती आहे. साई संस्थानच्या बंदीच्या निर्णयामुळे गुलाब फुलासह झेंडू, निशीगंध, सब्जाचे भाव कोसळले आहेत. साई संस्थानमुळे या शेकडो शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला हातभार लागतो. त्यामुळे साई संस्थानच्या या निर्णयात लक्ष घालून प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 163 अन्वये जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र चालवण्यास, उडविण्यास किंवा वापरण्यास मनाई आदेश जारी केला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. हे आदेश 3 जूनपर्यंत लागू राहील, असे सांगण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.