Shirdi Sai Sansthan corruption case : शिर्डीतील साई संस्थानच्या विद्युत विभागातील वीज साहित्य चोरीप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थानमधील तब्बल 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विद्युत विभागातील सुमारे 77 लाख 13 हजार 923 रुपयांच्या साहित्याच्या चोरीप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी यासंदर्भात न्यायालयीन पाठपुरावा केला. न्यायालयाच्या आदेशाने एवढ्या मोठ्या प्रमाणात संस्थानमधील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने खळबळ उडाली आहे.
शिर्डी (Shirdi) साई संस्थानच्या विद्युत विभागातील साहित्यांची डेड स्टॉक रजिस्टर प्रमाणे नोंदणी ठेवल्या नाहीत. यातच विद्युत साहित्याची चोरी केली गेली. चोरी गेलेल्या साहित्याची डेड स्टॉक रजिस्टरमध्ये बनावट नोंदी केल्या. लेखापरिक्षणात 77 लाखांपेक्षा जास्त वीज साहित्याची चोरी झाल्याचे समोर आलं.
या लेखापरिक्षणानुसार विद्युत विभागातील 47 आरोपींवर स्वतंत्रपणे चोरीच्या साहित्याच्या रकमेची जबाबदारी नक्की केली. त्यापैकी 39 जणांनी रकमेचा भरणा केला. उर्वरीत आठ जणांनी रक्कम भरली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सुरू केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या (Court) औरंगाबाद खंडपीठात संजय काळे यांनी जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाने त्यांना शिर्डी पोलिसांकडे फिर्याद देण्याचा आदेश केला. संजय काळे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली. या चोरीप्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने साई संस्थान वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संजय काळे यांनी सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "साईबाबा संस्थान विद्युत विभागाचा अंतर्गत लेखा परीक्षण केलं, यात 64 लाख रुपयांची विद्युत साहित्याची चोरी आढळली. यानंतर देखील साई संस्थांनी त्रयस्थ लेखापरीक्षण केले, त्यात 77 लाख रुपयांची वीज साहित्याची चोरी आढळली. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज साहित्यांची चोरी होत होती. 2023 मध्ये शिर्डी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली."
'स्थानिक पोलिसांनी या तक्रारीवर कारवाई केली नाही, म्हणून पोलिस अधीक्षक यांच्याकडे जात तक्रार केली. त्यांनी देखील कोणतीही कारवाई केली नाही, यावर पोलिसांनी मला, असे सांगितले की लेखापरीक्षणात घोटाळा दिसत असला तरी, याबाबतची तक्रार देण्याचा अधिकार हा साई संस्थानला आहे. यावर न्यायालयात जात, जनहित याचिका दाखल केली,' असे संजय काळे यांनी सांगितले.
'मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात, या जनहित याचिकेवर युक्तिवाद करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दखलपात्र गुन्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना देखील फिर्याद दाखल करण्याचा अधिकार आहे. उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली. याप्रकरणी साई संस्थांच्या लेखा परीक्षणानुसार 47 अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दोषी धरले असून त्यातील 39 जणांनी साहित्य चोरीचा भरणा, रकमेच्या स्वरूपात केला आहे. त्यानुसार साई संस्थांच्या तब्बल 47 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,' अशी माहिती संजय काळे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.