Vikram Pachpute Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Vikram Pachpute : 'सत्तेतील नेत्यांना विरोधकांचे पक्षप्रवेश सवयीचे'; जगताप-नागवडेंच्या NCP प्रवेशावर आमदार पाचपुतेंचा खोचक टोला

BJP MLA Vikram Pachpute has reacted to former MLA Rahul Jagtap and shivsenaUBT Rajendra Nagawade joining the Ajit Pawar-led NCP : श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रवेशावर भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

NCP vs BJP politics Maharashtra : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी चाळीस वर्षांत पराभव झाला म्हणून कधीच पक्षांतर केले नाही. त्याउलट गेल्या सहा महिन्यांत किती नेत्यांनी किती पक्ष बदलले ते सगळ्यांनी पाहिले आहे, असे म्हणत नेत्यांचे सत्तेतील पक्षप्रवेश सवयीचे असल्याचा खोचक टोला आमदार विक्रम पाचपुते यांनी विरोधकांना लगावला.

राष्ट्रवादीत आतापर्यंत आजी-माजी आमदारांचे झालेले प्रवेश पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झाले. पण आमच्याच तालुक्यातील माजी आमदारांचा प्रवेश प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित झाला, असं का झालं? असा सवाल करत आमदार पाचपुतेंनी माजी आमदार राहुल जगताप यांना डिवचलं आहे.

भाजप (BJP) आमदार विक्रम पाचपुते म्हणाले, "बबनराव पाचपुते यांनी सतत पक्षांतर केल्याची चुकीची चर्चा केली जाते. प्रत्यक्षात त्यांनी केवळ वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली आहे. त्यांनी चाळीस वर्षांत केवळ दोनवेळा पक्षांतर केले. वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढविणे आणि पक्षांतर या दोन्हीमध्ये मोठा फरक आहे".

'विधानसभा निवडणुकीत (Election) पराभव झाला म्हणून आम्ही कधीच पक्षांतर करीत सत्ताधारी पक्षात गेलो नाहीत. पाच वर्षे सजग विरोधकाची भूमिका बजावत पाच वर्षांनी निवडणुकीला सामोरे गेलो. जनतेने आम्हाला पुन्हा सत्तेत बसवले. सत्तेसाठी आम्ही कधीच पक्षांतर केले नाही. निवडणुकांना अद्याप अवकाश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील युतीबाबत जिल्हा व प्रदेश पातळीवर ज्याप्रमाणे निर्णय होईल, त्याप्रमाणे भूमिका घेऊ. नेते आल्याने महायुतीची ताकद वाढणार असेल, तर सगळ्यांचे स्वागत आहे', असेही आमदार पाचपुते यांनी म्हटले.

पक्षाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश का नाही?

गेल्या काही दिवसांत माजी आमदारांचे राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश झाले, ते सर्व प्रवेश पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले. मात्र, माजी आमदार व कारखान्याच्या अध्यक्षांचा पक्ष प्रवेश प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत का झाला? याबाबत आमदार विक्रम पाचपुते यांनी सवाल उपस्थित केला. शिवाय केवळ तिघांचेच प्रवेश झाल्याचे दिसते, यात कार्यकर्ते कुठे आहेत, हाही शोध घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

पावसामुळे नुकसान; पंचनामा सूचना

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिलेल्या आदेशांप्रमाणे तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवल्यास अन्य तालुक्यांमधून पर्यायी व्यवस्था करण्याबाबत चर्चा झाली आहे. भविष्यात शेतीविषयक योजना, नुकसान भरपाई सगळ्याच गोष्टींसाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीत श्रीगोंदे तालुका जिल्ह्यात सर्वांत मागे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ॲग्रीस्टॅकची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन पाचपुते यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT