
Shrirampur police arrest Telangana : श्रीरामपूर एमआयडीसीमधील प्लॉट क्रमांक 195(A) इथं कृत्रिम ताडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अल्प्राझोलम क्रिस्टलचे उत्पादन सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
याप्रकरणी तेलंगणातील प्रमुख सूत्रधाराला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने चार जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चौथ्या आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणात एकूण 13 कोटी 75 लाख 41 हजार रुपयांची अल्प्राझोलमसदृश्य पावडर अन् कच्चा माल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस (Police) उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 14 मे रोजी एमआयडीसी परिसरात टेम्पोमधून अंमली पदार्थांची वाहतूक करताना मिनीनाथ विष्णू राशीनकर (रा. धनगरवाडी, ता.राहाता) याला अटक करण्यात आली.
यानंतर सागर भुसारी (रा.धनगरवाडी) यालाही ताब्यात घेण्यात आले. भुसारीच्या चौकशीतून विश्वनाथ कारभारी शिपणकर (रा.दौंड, जि.पुणे) (PUNE) आणि अमर देशमुख (रा.कराड, जि.सातारा) यांच्या सहभागाचा उलगडा झाला. ही तिघेही उच्चशिक्षित असून, भुसारी हा मेकॅनिकल इंजिनीयर, शिपणकर याने केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तसेच देशमुख हा केमिकल इंजिनिअर असून ए.टेक. आणि पीएच.डी. केलेली आहे. कराड येथे त्याची स्वतःची फार्मा कंपनी आहे.
दरम्यान, देशमुख व शिपणकर हे तेलंगणात माल वितरित करताना पोलिसांच्या हाती लागले होते. याची माहिती मिळाल्यानंतर देशमुखला श्रीरामपूर पोलिसांनी येथील गुन्ह्यात वर्ग करून अटक केली. शिपणकरला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. देशमुखला न्यायालयात हजर केले असता चार जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून कसोशीने तपास सुरू आहे.
अल्प्राझोलम तयार करण्याच्या पाच स्टेजपैकी चार स्टेज कराडला कंपनीत पूर्ण होत होत्या. पाचवी आणि अंतिम स्टेज पावडरपासून क्रिस्टल तयार करण्याची ती श्रीरामपूर एमआयडीसीतील प्लांटमध्ये पार पडली जात होती. हा माल तेलंगणात पाठवण्यात येत होता. त्या ठिकाणी याचा वापर कृत्रिम ताडी तयार करण्यासाठी होत होता. एक ग्रॅम क्रिस्टलपासून तब्बल दोन हजार लिटर ताडी तयार होते, त्यासाठी युरिया आणि इतर रसायनांचा वापर केला जात होता.
तेलंगणात कृत्रिम ताडी तयार करण्यासाठी लागणारा माल एका गौडा नामक व्यक्तीच्या मार्फत विक्री केला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा गौडाही पोलिसांच्या रडावर आला आहे. दरम्यान एप्रिल महिन्यात तेलंगणात कृत्रिम ताडी पिल्याने अनेकांना त्रास झाला होता. याप्रकरणी मोठी कारवाईही तेथील पोलिसांनी केली आहे. त्यातील काही व्यक्तीचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे का? हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.