Ahilyanagar Gutkha Case : राज्यात गुटखा माफिया आणि भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने मोठी मोहीम उघडली असून, त्याचे पडसाद आता जिल्हा पातळीवरही दिसू लागले आहेत.
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा येथे स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत अलिशान कारमधून सुरू असलेली प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक उघडकीस आणली आहे. या कारवाईत तब्बल 28 लाख 88 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात अमोल रामदास जाधव (35), अनिल रतन कुरुमकर (43, दोघे रा. मुंढेकरवाडी, श्रीगोंदा) आणि फरहान रेहमान बेपारी (23, बुरुड गल्ली, श्रीगोंदा) यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. मात्र या कारवाईदरम्यान चार आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले, त्यामुळे त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीगोंदा (Shrigonda) परिसरात नियमित पेट्रोलिंग करत असताना मुंढेकरवाडी येथे अमोल जाधव हा मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी आणत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने तातडीने छापा टाकत अमोल जाधवच्या घरासह परिसराची तपासणी केली.
या तपासादरम्यान पोलिसांना पांढऱ्या रंगाच्या कारमधून काही गोण्या दुसऱ्या स्विफ्ट कारमध्ये भरताना संशयित दिसले. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळी अमोल जाधव, अनिल कुरुमकर आणि फरहान बेपारी यांना पकडले. यावेळी 6 लाख 3 हजार 200 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, 22 लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या, 30 हजार 130 रुपये रोख रक्कम आणि 55 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन असा एकूण 28.88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात अमोल जाधव आणि दीपक लोखंडे (लोखंडेवाडी, श्रीगोंदा) हे भागीदारीत हा अवैध व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले आहे. हा प्रतिबंधित माल त्यांनी Jat येथून अप्पू आणि माजिद या दोघांकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच फरहान बेपारी हा शोयेब राजू तांबोळी यांच्या सांगण्यावरून हा माल विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार मनोज मोहन साखरे यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपासाची जबाबदारी आता श्रीगोंदा पोलिस ठाणे यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान, पसार चार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम सुरू असून, या गुटखा रॅकेटमागे आणखी मोठे जाळे आहे का, याचा तपास सुरू झाला आहे. राज्यात गुटखा माफियांवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरातील ही कारवाई सध्या मोठी चर्चेचा विषय ठरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.